शासकीय रूग्णालयांतील प्रसुतींचा आलेख उंचावला
By Admin | Updated: June 22, 2015 00:19 IST2015-06-21T23:50:12+5:302015-06-22T00:19:36+5:30
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मातृत्व संवर्धन दिन, मदर अॅन्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम आदी उपक्रम पूर्णक्षमतेने राबविण्यात येत असल्याने

शासकीय रूग्णालयांतील प्रसुतींचा आलेख उंचावला
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मातृत्व संवर्धन दिन, मदर अॅन्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम आदी उपक्रम पूर्णक्षमतेने राबविण्यात येत असल्याने शासकीय रूग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसुतींचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे खाजगी रूग्णालयांतील प्रसुतींचा आलेख दिवसेंदिवस खाली येऊ लागला आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसुतींचे प्रमाण ५९ वरून ६९ टक्क्यांवर जावून ठेपले आहे. तर खाजगी रूग्णालयांचे प्रमाण हे ३६ वरून २९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून ही बाब समाधानाची मानली जात आहे.
रूग्णालयीन प्रसुतींचे प्रमाण वाढावे, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ‘मातृत्व संवर्धन दिन’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या २ आणि १६ तारखेला गरोदर मातांना आवश्यक सेवा पुरविल्या जातात. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत गरोदर महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे रक्तगट, हिमोग्लोबीन, एचआयव्ही आदी चाचण्याही केल्या जातात. तसेच मदर अॅन्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम (एमसीटीएस) हा उपक्रमही राबविण्यात येत आहे. याच्या अंमलबजावणीमध्ये उस्मानाबाद जिल्हा अव्वल आहे. यासोबतच अन्य उपक्रमही राबविण्यात येत असल्याने जिल्ह्यातील रूग्णालयीन प्रसुतींच्या प्रमाणाचा आलेख उंचावत आहे. २०१४-१५ मध्ये रूग्णालयीन (खाजगी व शासकीय) प्रसुतींचे प्रमाण तब्बल ९९ टक्क्यांवर जावून ठेपले आहे. वर्षभरात जिल्ह्यात २६ हजार ६६५ महिला प्रसूत झाल्या. यापैकी २६ हजार ४५२ महिलांनी प्रसुतीसाठी रूग्णालय जवळ केले. तर अवघ्या २१७ महिलांची प्रसुती ही घरी झाली. यामध्ये शासकीय रूग्णालयांनी खाजगी दवाखान्यांना ‘ओव्हरटेक’ केले आहे. २६ हजार ६६५ पैकी केवळ ८ हजार ३३७ महिलांची प्रसुती खाजगी दवाखान्यात झाली. तर शासकीय रूग्णालयाचा आधार घेणाऱ्या महिलांची संख्या ही १७ हजार ९९० एवढी आहे. हे प्रमाण ६९ टक्के एवढे आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यालाही उस्मानाबादने मागे टाकले आहे. येथील शासकीय रूग्णालयातील प्रसुतींचे प्रमाण हे ६४ टक्के, बीड ५२ टक्के आणि नांदेड जिल्ह्यातील प्रमाण ६८ टक्के एवढे आहे. दरम्यान, प्रसुतीसाठी महिला रूग्णालयांना पसंती देत असल्याने घरगुती प्रसुतींचे प्रमाण घटत आहे. त्यामुळेच माता मृत्युचे प्रमाण कमी होवू लागले आहे. २००५-०६ मध्ये जिल्ह्याचा माता मृत्यू दर १.१० टक्के एवढा होता. २००६-०७ मध्ये घट होवून प्रमाण १०.२ पर्यंत खाली आले होते. तसेच २००७-०८ मध्ये ०.८८, २००८-०९ हे प्रमाण स्थिर राहिले. २००९-१० मध्ये ०.८२, २०१०-११ मध्ये ०.८१, २०११-१२ मध्ये ०.७८, २०१२-१३ मध्ये ०.७९ तर २०१३-१४ मध्ये सदरील प्रमाण ०.४५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. २००५-०६ च्या तुलनेत बालक मृत्यूचा दरही कमी झाला आहे. ६०.०८ वरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एकूणच शासकीय रूग्णालयांतून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेबाबत नाक मुरडणाऱ्या रूग्णांची पाऊले पुन्हा याच रूग्णालयाकडे वळताना दिसत आहेत.
मदर अॅन्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम (एमसीटीएस) ही योजना राबविण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर आहे. वर्षभरापूर्वी हा जिल्हा २७ व्या स्थानावर होता. तसेच नांदेड जिल्हा पंधराव्या क्रमांकावर असून लातूर चौदाव्या तर बीड सोळाव्या स्थानावर आहे. या उपक्रमामुळेच रूग्णालयीन प्रसुतींच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उभारण्यात आलेली प्रसुतीगृहे अद्ययावत करण्यात आली. तसेच मातृत्वदिन हा उपक्रमही हाती घेण्यात आला. त्याचप्रमाणे ‘एसीटीएस’ ही योजनाही पूर्ण ताकदीने राबविली जात आहे. या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून सध्या शासकीय रूग्णलयांतील प्रसुतीच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होवू लागली आहे. ज्या आरोग्य केंद्रात वर्षाल आठ ते दहा महिलांची प्रसुती होत असे. तेथे आज महिन्याकाठी ३५ ते ४० प्रसुती होत आहेत, असे ‘डीएचओ’ डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले.