पुढाऱ्यांकडून आश्वासनांचा पाऊस

By Admin | Updated: October 9, 2014 00:37 IST2014-10-09T00:15:45+5:302014-10-09T00:37:08+5:30

संतोष धारासूरकर, जालना या जिल्ह्यावर वरूणराजाने जरी वक्रदृष्टी दाखविली असली तरीही

The rainy days of the leaders promised | पुढाऱ्यांकडून आश्वासनांचा पाऊस

पुढाऱ्यांकडून आश्वासनांचा पाऊस


संतोष धारासूरकर, जालना
या जिल्ह्यावर वरूणराजाने जरी वक्रदृष्टी दाखविली असली तरीही पुढाऱ्यांनी मात्र गल्लीबोळापासून खेडोपाडी वाडी, तांड्यांपर्यंत आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडून सर्वसामान्य जनतेला ओलेचिंब केले आहे.
निवडणुका म्हटल्या की, खैरातबाजी आलीच. ती पैशाची असो की आश्वासनांची. प्रत्येक निवडणुकीतील हे चित्र आता सर्वसामान्य जनतेला अक्षरश: अंगवळणी पडले आहे. याही निवडणुकीत त्याचेच प्रत्यंतर नागरिक अनुभवत आहेत. विशेषत: गेल्या अनेक निवडणुकांच्या तुलनेत यावेळी चित्र थोडे निराळे आहे. कारण वर्षानुवर्षांपासून ऋणानुबंधात गुरफटलेल्या महायुती व आघाड्यातील मित्रपक्ष परस्परांविरोधात दंड थोपाटून उभे आहेत. इच्छुकांसह कार्यकर्त्यांच्याही कोलांटउड्यांमुळेच या गोंधळावस्थेत कोण कोणाचा, हेच कळेनासे झाले आहे. लढतीतील संभ्रमावस्था व विलक्षण स्थितीमुळेच सर्वसामान्य मतदारांबरोबर मातब्बर सुद्धा चक्रावून गेले आहेत. त्यामुळेच प्रचार युद्धात भांबावलेल्या अवस्थेतील उमेदवार, त्यांचे कुटुंबिय प्रत्येक मतासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. त्यातूनच पाचही मतदारसंघातील प्रचारयुद्धाने अक्षरश: कळस गाठला आहे.
गेल्या सात-आठ दिवसांपासून परस्परांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत. पक्षीय पातळीवरील टीका, टिपण्णीने व्यक्तीगत पातळी गाठली आहे. ऐनकेन प्रकारे मतासाठीच उमेदवारांनी सर्वस्व पणास लावले आहे. त्यातूनच आश्वासनांच्या खैरातबाजीनेही टोक गाठले आहे. गल्लीबोळापासून खेडोपाडी, वाडी, तांड्यांपर्यंत प्रचार दौऱ्यातून उमेदवार मतदारांसमोर भव्यदिव्य स्वप्ने रंगवित आहेत. विशेषत: ग्रामीण भागात मातीमुरूमाचा, खडीचा, सिमेंट किंवा डांबराचा रस्ता, आखाड्यांपर्यंत पांदण रस्ते, पिण्यासह सांडपाण्यासाठी टाक्या, नळयोजना, जलवाहिन्या, स्वतंत्र डी.पी., ३३ के.व्ही. उपकेंद्र, सुरळीत वीजपुरवठा, सिंगलफेज योजना, कृषिपंपांना जोडण्या, आरोग्याविषयक सोयी, सुविधा त्यात दवाखाना, रुग्णवाहिका, औषधी जनावरांसाठीही दवाखाना, इमारती, जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षकांच्या नियुक्त्यांपासून शैक्षणिक साहित्य, संगणक, उच्चशिक्षणाच्या सुविधा, आयटीआय, विविध अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परीक्षांसाठी क्लासेस, अभ्यासिका, गावतांड्यापर्यंत बस, स्टॉप, बसस्थानक, तालुकास्थानी आगार, विविध समाजासाठी स्वतंत्र स्मशानभुमी, सामाजिक सभागृहे, ग्रा.पं.साठी इमारत, संगणकीकरण, अद्ययावत कार्यालये, पथदिवे, गावागावात मंगल कार्यालये, भांडीकुंडी, बँकेच्या शाखा, शेतीमाल विक्रीसाठी बाजारसमिती किंवा उपबाजार समिती, आठवडी बाजारातून सुविधा, शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज, सुलभ पीकविमा, कोरा सातबारा, फळउत्पादकांसाठी शीतगृह, छोट्या-मोठ्या नदी, नाल्यांवर कोल्हापुरी, शिरपूर पॅटर्न बंधारे, पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेतून शेततळी, गावतळी, पाझर तलाव, नाला सरळीकरण, शेतजमिनीचे अस्तारीकरण, पाणलोट क्षेत्रात उपसा जलसिंचन योजना, जायकवाडी किंवा अन्य सिंचन प्रकल्पातून कालवे, चाऱ्या, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांना शेतीसाठी अवजारे, कृषिपंप, ठिबक सिंचन संच, विहिर, शेडनेट, योग्य मोबदला, अल्पभूधारक व भूमिहिनांना विशेष सवलती, मागसवर्गीयांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना गायरान जमिनी, घरकुले, वृद्ध, निराधार व उपेक्षित, विधवा, परितक्त्या, महिलांना विविध योजनांतून मानधन, रेशन, घरकुले, महिलांची सुरक्षितता, बचत गटांना प्रोत्साहन, कर्ज वितरण, व्यवसाय वृद्धीसाठी प्रशिक्षण, मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून धार्मिक स्थळांचा विकास, मंदिरांचा जीर्णाेद्धार, कळशारोहण, ध्वनिक्षेपकासह भजन कीर्तनास साहित्य, सभामंडप, भक्तनिवास, मंदिर परिसर विकास, पाण्याची व्यवस्था, उद्याने, पथदिवे, सौरउर्जेवरील दिवे, तरूणांसाठी व्यायामशाळा, बारा बलुतेदारांसाठी स्टॉल्स, अर्थसहाय्य, सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगाविषयी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, रोजगार, शेतमजुरांना राहयोतून नियमितपणे कामे, स्वस्त धान्य दुकानातून रेशनपुरवठा, त्या-त्या गावातील संत-महंतांचे पूर्णाकृती, अर्धाकृती पुतळे, हुतात्मा स्मारकांचे पुनरूज्जीवन, वाचनालये वगैरे आश्वासने सर्रासपणे दिली जात आहेत.

Web Title: The rainy days of the leaders promised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.