शेळका धानोऱ्यात कोरडा दिवस
By Admin | Updated: August 9, 2014 00:35 IST2014-08-09T00:10:12+5:302014-08-09T00:35:09+5:30
कळंब : तालुक्यातील शेळका धानोरा येथे डेंग्यू सदृश्य तापाच्या आजाराने एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाला जाग आली आहे़

शेळका धानोऱ्यात कोरडा दिवस
कळंब : तालुक्यातील शेळका धानोरा येथे डेंग्यू सदृश्य तापाच्या आजाराने एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाला जाग आली आहे़ गावात तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, कोरडा दिवस पाळण्यात आला़ दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी ३५ जणांची तपासणी केली़ काहींचे रक्तनमुने घेवून बीड जिल्हा रूग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़
कन्हेरवाडी येथील चिकुन गुनियाची साथ नियंत्रणात येताच तालुक्यातील शेळका धानोरा येथे पुजा किसन पांचाळ या १५ वर्षीय मुलीचा डेंग्यू सदृश्य तापाच्या आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले़ या घटनेमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली़ शेळका धानोरा येथे मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तळ ठोकला आहे़ गुरूवारी सायंकाळी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त ग्रामसभा घेवून जनजागृती करण्यात आली़ यावेळी जिपचे उपाध्यक्ष संजय पाटील यांची उपस्थिती होती़
शुक्रवारी गावात कोरडा दिवस पाळण्यात आला़ तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अप्पासाहेब शेळके व ग्रामस्थांनी गांभिर्याने लक्ष देत श्रमदानातून नाल्या व परिसर स्वच्छ करून घेतला़ गावातील कॅम्पमध्ये शुक्रवारी ३५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ आठवडाभरापासून ताप असलेल्या किंवा आठवडाभरापूर्वी ताप आलेल्या दहा नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत असून, अधिक तपासणीसाठी हे नमुने बीड येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़ (वार्ताहर)