'सुपर संडे' ला पावसाचा फटका
By Admin | Updated: September 1, 2014 00:24 IST2014-09-01T00:16:03+5:302014-09-01T00:24:08+5:30
नांदेड : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडेचे आयोजन करण्यात आले होते़

'सुपर संडे' ला पावसाचा फटका
नांदेड : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडेचे आयोजन करण्यात आले होते़ परंतु रविवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले़ त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर नवीन नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद मिळाला़
रविवारी ३१ आॅगस्ट रोजी भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारयाद्यात नाव समाविष्ट करणे, किंवा फोटो नसेल तर फोटो तसेच अन्य नोंदी अद्ययावत करण्यासाठी सुपर संडेची संधी देण्यात आली होती़ यासंदर्भात शनिवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेवून मतदार जागृतीविषयी अधिक सतर्क आणि सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार होते़
रविवारी शहरातील मतदान केंद्र निहाय मतदार याद्यांतील आपल्या नावाची खात्री करून घेऊन, तपशील, फोटो याबाबत अद्ययावत करण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते़ मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नावर पावसाने पाणी फेरले़
जिल्ह्यात गत पाच, सहा दिवसांपासून पावसाने चांगली सुरूवात केली आहे़ रविवारी मध्यरात्रीनंतर पाऊस सुरू झाला़ तो दिवसभर सुरूच होता़ त्यामुळे अनेक मतदारांना मतदान केंद्राकडे जाताच आले नाही़ त्यामुळे अपेक्षित नवीन नोंदणी होवू शकली नाही़ तरोडा खु़ भागातील मतदान केंद्र दूर असल्याने व त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांनी चिखलात जाण्याचे टाळले़ या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांनाही चिखलातून वाट काढत जावे लागते़
या केंद्रावर दिवसभरात केवळ ५ जणांनी मतदारयादीत नावनोंदणी केली़ तरोडा भागातील जवळपास सर्व केंद्रावर अशीच परिस्थिती आढळून आली़
यापुर्वी ज्यांनी मतदारयादीत नाव नोंदणी केली होती़ त्यांना आपले नावे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर यादी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ (प्रतिनिधी)