परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:07 IST2017-07-19T00:05:38+5:302017-07-19T00:07:04+5:30
परभणी : मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध भागात भुरभूर पाऊस सुरू होता़ दिवसभरात कुठेही मोठ्या स्वरुपाचा पाऊस झाला नाही़

परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध भागात भुरभूर पाऊस सुरू होता़ दिवसभरात कुठेही मोठ्या स्वरुपाचा पाऊस झाला नाही़
यावर्षी जिल्ह्यामध्ये पावसाने ताण दिल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ परंतु, तीन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून, हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे़ परंतु, अजूनही सर्वदूर पाऊस झाला नाही़ त्यामुळे काही भागात पिकांची परिस्थिती नाजूक आहे़ मंगळवारी परभणी शहर परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते़ सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी झाल्या़ तालुक्यातील पोखर्णी येथे सायंकाळी १० मिनिटे रिमझिम पावसाने हजेरी लावली़
सोनपेठ तालुक्यातही रात्री ८ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती़ सेलू, पाथरी, मानवत तालुक्यात रिमझिम पाऊस झाला़ मात्र गंगाखेड, जिंतूर, पूर्णा तालुक्यात पाऊस झाला नाही़ तीन दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होत आहे़ हा पाऊस समाधानकारक नसला तरी पिकांना मात्र दिलासा देणारा ठरला आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये जून महिन्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या़ परंतु, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने चिंता वाढल्या होत्या़ सोयाबीन, कापूस ही पिके पावसाअभावी माना टाकू लागली होती़ काही भागात तर शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवून दुबार पेरणीची तयारी देखील केली होती़ मात्र ऐनवेळी पावसाचे आगमन झाले आहे़ सर्वदूर पाऊस होत नसून हा पाऊस समाधानकारक नसला तरी पिकांना जीवदान देणारा ठरला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा दूर झाल्या आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत १७३़८ मिमी पाऊस झाला आहे़ अपेक्षित पावसाच्या तुलनेत ६९ टक्के पाऊस झाला असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही़