‘मघा’वर पावसाची मदार
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:44:57+5:302014-08-17T00:54:40+5:30
यशवंत परांडकर, नांदेड रोहिणी वगळता आतापर्यंतच्या पाचही नक्षत्राने म्हणावी तशी साथ दिली नाही.

‘मघा’वर पावसाची मदार
यशवंत परांडकर, नांदेड
रोहिणी वगळता आतापर्यंतच्या पाचही नक्षत्राने म्हणावी तशी साथ दिली नाही. पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत़ उगवलेल्या पिकांना दिलासा देत किमान पेयजलाचा तरी प्रश्न मार्गी लागावा़ याची मदार आता सर्वस्वी मघा नक्षत्रावर अवलंबून आहे़ कोल्हेकुई ऐकू जाईल अन् वरुणराजा बरसेल या अपेक्षेने शेतकरी आभाळाकडे पाहत आहे़
मघा नक्षत्र १६ आॅगस्ट रोजी सुरु झाले असून २९ आॅगस्टपर्यंत राहणार आहे. नक्षत्राचे वाहन ‘कोल्हा’ आहे.
हे नक्षत्र काही अनियमितता दाखविल तर काही ठिकाणी ओढ लावेल, असे जाणकारांचे मत आहे. मघा नक्षत्राच्या ‘कोल्ह्या’ ने पाऊस आणला तर पिके तग धरु शकतील, शिवाय जलसाठ्याची पाणीपातळी वाढीस लागेल़
पोळा सण जवळ आला तरी अद्याप म्हणावा तसा मोठा पाऊस झाला नाही. पावसाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील बहुतांश भागात केलेली धुळपेरणी मातीत गेली़ तरीही न खचता शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ यावर्षी मृग, आर्द्रा नक्षत्रात पेरणी झाली असती तर मघा नक्षत्रात पिके हाती आली असती. आश्लेषा नक्षत्राच्या मध्याला मुगाच्या शेंगा खायला येतात तर काही ठिकाणी बिटाला नेण्यासाठी शेतकरी तयार असतात. रोहिणी नक्षत्र वगळता मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा ही पाचही नक्षत्रे कोरडी गेली. दुसरीकडे अजून एकदाही नदी, ओढ्यांना पूर आला नाही. मघा नक्षत्रात पाऊस पडावा, यासाठी शेतकरी देव पाण्यात ठेवून आहेत. या नक्षत्रात चांगला पाऊस पडला तरच स्थिती काहीसी बदलेल़
एकंदर मघा नक्षत्रातील पावसावरच पिकांची दारोमदार असल्याची माहिती हदगाव तालुक्यातील शेतकरी गजानन लोमटे, मुदखेड तालुक्यातील दिगंबर चव्हाण, अर्धापूर तालुक्यातील सूर्यकांत कदम यांनी दिली.