पंचावन्न लाख वृक्ष लागवडीस पावसाचा ‘ब्रेक’
By Admin | Updated: July 4, 2014 00:14 IST2014-07-03T23:21:18+5:302014-07-04T00:14:11+5:30
दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात विविध विभागांकडून ५६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ आहे. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांनी तयारी केली असली तरी पाऊस नसल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’ लागला आहे.

पंचावन्न लाख वृक्ष लागवडीस पावसाचा ‘ब्रेक’
दिनेश गुळवे , बीड
यावर्षी जिल्ह्यात विविध विभागांकडून ५६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ आहे. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांनी तयारी केली असली तरी पाऊस नसल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’ लागला आहे.
‘एक व्यक्ती, एक झाड’ या प्रमाणे वृक्षारोपण करण्याचे शासनाचे धोरण आहे. वृक्षलागवड करण्यासाठी ‘शतकोटी वृक्षलागवड’ सारख्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येतात. राज्याच्या एकूण भूभागाच्या ३३ वनक्षेत्र असावे, असा नियम आहे. असे असले तरी महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्के आहे. या तुलने मराठवाड्याचे वनक्षेत्र ६ टक्के आहे. तर, बीड जिल्ह्याचे वनक्षेत्र अगदीच अल्प म्हणजे अवघे २.१७ टक्के आहे.
वनक्षेत्र अगदीच अल्प असल्याने याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. वनक्षेत्र पुरेसे नसल्यामुळे पावसाचे प्रमाणही घटतेच आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वाढत्या तापमानाचा धोका कमी करण्यासाठी ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना पुढे आली. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ देण्यात आले.
यावर्षी जिल्हा परिषदेचे विविध विभाग २६ लाख ५० हजार, वन विभाग १३ लाख, कृषी विभाग ९ लाख आदींप्रमाणे विविध कार्यालयांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्याचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ४५ लाख होते. गतवर्षी सुरुवातीपासूनच पाऊस असल्याने सर्वच विभागाने वृक्षलागवडीचे दिलेले उद्दिष्ठ पूर्ण केले. काही विभागांनीतर दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक वृक्षारोपण केले. यामुळे गतवर्षी तब्बल १२८ टक्के वृक्षलागवड झाल्याचे विभागीय वन अधिकारी काळे यांनी सांगितले.
यावर्षीही वृक्षलावगवडीची खड्डे खोदण्यापासून सर्वच तयारी करण्यात आली आहे. शासकीय रोपवाटिकेसह इतर खाजगी रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्यात आली आहे. तर, सामाजिक वनीकरण विभागाने लातूर, उस्मानाबाद आदी ठिकाणाहून रोपे आणण्याचे तयारी केली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातच पुरेसे रोपे उपलब्ध असल्याने रोपे बाहेरून आणावे लागली नाही, यावर्षी मात्र जिल्ह्यात रोपांची टंचाई असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक कुलकर्णी यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अंतर्गत ‘शतकोटी वृक्षलागवड’ योजना राबविण्यात येणार आहे तर सामाजिक वनीकरण अंतर्गत हरितसेनासह दुतर्फा वृक्षलागवड, पडिक जमिनीवर वृक्षलागवड, गट वनीकरण करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गट वनीकरणातून ५० हजार तर दुतर्फा वृक्षलागवड योजनेतून दहा हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत.
यावर्षी जिल्ह्यात वृक्षलावगडीचे मोठ्याप्रमाणावर नियोजन करण्यात आले असले तरी अद्याप पाऊसच न पडल्याने वृक्षलागवडीस ब्रेक लागला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस पाऊस पडला तर वेळेवर वृक्षारोपण होते. तसेच यावेळी लावलेल्या वृक्षांना पुढे उन्हाळ्यामध्ये जोपण्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे जूनमध्ये वृक्षारोपण होणे गरजेचे असल्याचेही सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले.
पाऊस पडताच वृक्षलागवड करू
गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी असलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते, यावर्षी पाऊस नसल्याने अद्याप वृक्षलागवड होऊ शकली नाही. वृक्षलागवडीसाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे. पाऊस पडताच वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास विभागीय वन अधिकारी काळे यांनी व्यक्त केला.
विभाग गतवर्षीची वृक्षलागवड यावर्षीची वृक्षलागवड नियोजन
जिल्हा परिषद २११७७१४ २६ लाख ५० हजार
वनविभाग ११०८४३८ १३ लाख
कृषी विभाग २११७७१४ ९ लाख
सा. वनीकरण ५००००६ २ लाख
नगर पालिका, सा. बां. १ लाख १ लाख