जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

By Admin | Updated: June 11, 2014 00:52 IST2014-06-11T00:43:33+5:302014-06-11T00:52:56+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील काही भागात मंगळवारी मृगाने जोरदार हजेरी लावली.

Rain with windy wind in the district | जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील काही भागात मंगळवारी मृगाने जोरदार हजेरी लावली. यात पाऊस कमी अन् वाराच जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली.
पिशोरमध्ये बाजारकरूंचे हाल
पिशोर : पिशोरसह परिसरातील गावांचे मंगळवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने नुकसान केले. अनेक घरावरील, गोठ्यावरील पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार सोसाट्याचे वादळ सुरू झाले. अचानक आलेल्या वादळाने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे, तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानांवरील पाल दूरवर उडून गेले. यामुळे काही क्षणात बाजार होत्याचा नव्हता झाला होता. बाहेरगावहून आलेल्या व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने गुंडाळली, ग्राहकांचीही पळापळ झाली. नाचनवेल, आडगाव, करंजखेड परिसरातही मोठे नुकसान झाले.
सारोळा, आमदाबादमध्ये मोठे नुकसान
पिशोरच्या पूर्वेकडील नाचनवेल, आडगाव (पि.), आमदाबाद, सारोळा आदी गावांना जोरदार वाऱ्यासह पावसानेही झोडपले. येथील अनेक घरे, जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाले, असे माजी उपसरपंच अकबर शहा व राजू बनकर यांनी सांगितले. या वादळात सुदैवाने जीवित हानी टळली. वादळानंतर अनेक ठिकाणी वीज गुल झाली होती.
शिऊर परिसरात कांदाचाळींना फटका
शिऊर : सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह भायगावगंगा, उंदिरवाडी, पाशापूर गावातील कांदाचाळीचे नुकसान झाले. अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले.
भायगावगंगा येथील गणेश कदम यांच्या घरावरील ४० पत्रे उडून गेल्याने ते पूर्णत: उघड्यावर आले. त्यात संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली, तर रंगनाथ श्रीराम कदम, सोमनाथ रुस्तुम कदम, सुभाष भागाजी सोनवणे, तुळशीराम धारुबा वाळुंज आदींच्या कांदाचाळीचे पत्रे उडून नुकसान झाले, तर गोविंद कचरू माचे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. पाशापूर येथील नारायण किसन माचे यांच्या कांदाचाळीचे नुकसान झाले. भायगावगंगा येथील संतोष कदम यांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर अर्जुन कदम, गणेश कदम यांच्याही कांदाचाळीचे नुकसान झाले. पं.स. सदस्य रामहरी जाधव यांनी या गावात जाऊन पाहणी केली. मंडळाधिकारी व तलाठी यांना पंचनामे करण्यास सांगितले. याप्रसंगी अप्पा कदम, भाऊसाहेब आवारे, सुखदेव बाबा, धोंडिराम गुरव, एस.के. पाटील, शिवाजी कदम, पांडुरंग बडग, नारायण माचे, फकिरा कदम उपस्थित होते.
लासूरगावात एक तास हजेरी
लासूरगाव : सोमवारी रात्री १० वाजता मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. अवघ्या एका तासामध्ये ३० मि.मी. पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठी तारांबळ उडाली.
चिंचोली (लिंबाजी) परिसरात तुफान
चिंचोली (लिंबाजी)सह परिसरात मंगळवारी तुफानी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने व वाऱ्याने शेकडो घरावरील पत्रे उडून गेले व मोठी झाडे उन्मळून पडली. यामुळे चिंचोली-कन्नड व चाळीसगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली व वीजपुरवठा खंडित झाला.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह तुफानी पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने शेकडो घरावरील पत्रे उडाले. अनेक ठिकाणी तारा तुटल्या व विद्युत पोल उन्मळून पडले. यामुळे परिसरातील गावांचा विद्युत पुरवठा बंद झाला. नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, बालखेडा, चिंचोली भागात वाऱ्याचा जोर जास्त असल्याने शेकडो झाडे उन्मळून पडली.
चिंचोली लिंबाजी, कन्नड व चाळीसगाव रस्त्यावर दहा ते पंधरा ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी न आल्याने वाहतूक जैसे थे होती.
प्रवाशांना मोठा त्रास
लांब पल्ल्याच्या मुक्कामी गाड्या अडकून पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास झाला. सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमीच होती. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तरी नागरिकांची मात्र धांदल उडाली आहे.
भराडीतील शेतकरी आनंदी
भराडी भागात मंगळवारी मृग नक्षत्राचे आगमन झाल्याने भराडीसह परिसरातील शेतकरी आनंदी झाला आहे. बोरगाव बाजार, बोरगाव सारवाणी, वांगी बु., तळणी, कासोद, वडोदचाथा या गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान पंधरा ते वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. उन्हाने लाहीलाही होत असताना पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे. जून महिना सुरू होऊन दहा दिवस झाले होते तरीही शेतकरी वर्ग बी-बियाणे खरेदी करीत नव्हता. पावसाने हजेरी लावल्याने आता तरी शेतकरी वर्ग बी-बियाणे खरेदी करतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
सिल्लोड तालुक्यात काही भागांत पावसाचे आगमन
सिल्लोड तालुक्यात मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास काही भागांत मृग नक्षत्राचे आगमन झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक घरांवरील पत्रे उडाले. मंगळवारी शहरासह बोरगाव बाजार, भराडी, आमठाण, अंधारी, पळशी, केऱ्हाळा या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. काही भागात मध्यम, तर काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. पावसामुळे काही भागातील नागरिकांना दिलासा मिळाला.

Web Title: Rain with windy wind in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.