पावसाने धुतले, शहरात रात्रभरात ३२ मि. मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:50 IST2016-07-27T00:22:37+5:302016-07-27T00:50:42+5:30
औरंगाबाद : दोन आठवड्यांपासून अधूनमधून केवळ रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी मध्यरात्री मात्र शहरात जोरदार हजेरी लावली.

पावसाने धुतले, शहरात रात्रभरात ३२ मि. मी. पाऊस
औरंगाबाद : दोन आठवड्यांपासून अधूनमधून केवळ रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी मध्यरात्री मात्र शहरात जोरदार हजेरी लावली. शहरातील सर्वच भागात रात्री सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहिले. रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाणी साचले.
सोमवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर शहरात धो धो पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस बरसत होता. तर काही भागात पहाटेच्या वेळी पाऊस झाला. विशेषत: उस्मानपुरा, चिकलठाणा, कांचनवाडी, सातारा परिसर, गारखेडा, रेल्वेस्टेशन या भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तास दीड तास झालेल्या या पावसामुळे शहरातील नाले ओसंडून वाहिले. चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची नोंद ३२ मि. मी. एवढी झाली, असे असले तरी काही भागात हा पाऊस याहीपेक्षा अधिक होता. उस्मानपुरा मंडळात तब्बल ५५ मि. मी. पावसाची नोंद झाली. याचप्रमाणे कांचनवाडी मंडळातही ५३ मि. मी. पाऊस झाला. हर्सूल मंडळात २४ मि. मी. भावसिंगपुरा मंडळात २२ मि. मी. पावसाची नोंद झाली.