घाटनांद्रा शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST2021-05-18T04:04:27+5:302021-05-18T04:04:27+5:30
घाटनांद्रा : घाटनांद्रा परिसरात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका सोमवारी दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच ...

घाटनांद्रा शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी
घाटनांद्रा : घाटनांद्रा परिसरात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका सोमवारी दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच वातावरणात बदल झाल्याने गारवा सुटला होता, तर सकाळच्या सत्रात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या आमराईतील आंबे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचा तडाखा ग्रामीण भागालाही चांगलाच बसू लागला आहे. घाटनांद्रा परिसरात सोमवारी दुसऱ्या दिवशी देखील ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. थंडगार वादळी वारे वाहत होते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही उन्हाळी मका, कांदा उभा आहे, या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तर आंब्याच्या झाडाला लगडलेले गावरान आंबे देखील खाली पडून आमराईचे नुकसान झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची कामे करीत आहेत. परंतु, अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेती मशागतीची कामे थांबली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. असे शेतकरी भागवत मोरे, गणेश मालोदे, प्रतीक मोरे या शेतकऱ्यांनी सांगितले.
फोटो : घाटनांद्रा परिसरात जोरदार वाऱ्यामुळे शेतशिवारात आंब्याचे नुकसान झाले आहे.
170521\datta revnnath joshi_img-20210517-wa0027_1.jpg
घाटनांद्रा शिवारात गावरान आंबे सोसाट्याच्या वाऱ्याने अशी जमीनदोस्त झाली आहेत.