पाऊस आला धावून, पूल गेला वाहून
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:55:59+5:302014-07-13T00:17:46+5:30
कडा: आष्टी ते डोईठाण मैंदा या रस्त्यावर असलेल्या नदीवर दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता.

पाऊस आला धावून, पूल गेला वाहून
कडा: आष्टी ते डोईठाण मैंदा या रस्त्यावर असलेल्या नदीवर दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता. हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे.
आष्टी ते डोईठाण या रस्त्यावर बावी गाव आहे. या गावाजवळून जाणाऱ्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता. येथून शालेय विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, महिला मोठ्या प्रमाणावर ये- जा करतात. येथील नदीला पाणी आल्याने ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प होते. यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमधून केली जात होती. बावीजवळील नदीवर पूल झाल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात होते. पाऊस पडल्यानंतरही शेतात ये- जा करण्यास अडचण येणार नाही, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र पहिल्याच पावसाने ग्रामस्थांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. पूल वाहून गेल्याने येथून पायी चालणेही आता जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे हा पूल तात्काळ पुन्हा दर्जेदार बांधावा, अशी मागणी होत आहे. या संदर्भात उपअभियंता पाटील म्हणाले, सध्या आपण मुंबईला आहोत. तेथे आल्यानंतर पुलाची पाहणी करून निर्णय घेऊ. (वार्ताहर)
कमी दर्जाचे साहित्य वापरले- गोल्हार
ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सा.बां.च्या वतीने येथे पुलाचे काम करण्यात आले. मात्र हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पुलाचे बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप विजय गोल्हार यांनी केला आहे. हे काम करताना नियमांचे पालनही केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.