पावसाने पुन्हा डोळे वटारले
By Admin | Updated: August 22, 2015 23:58 IST2015-08-22T23:53:05+5:302015-08-22T23:58:23+5:30
उस्मानाबाद : मागील आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

पावसाने पुन्हा डोळे वटारले
उस्मानाबाद : मागील आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी उस्मानाबादसह लोहारा, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. हा पाऊस सक्रीय होवून चारा-पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र मागील दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असतानाही पाऊस न झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झालेला नव्हता. उमरगा, लोहारा आणि कळंब परिसरात शुक्रवारी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी या परिसरातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शुक्रवारी उस्मानाबाद तालुक्यात अवघा ०.५० मिमी, उमरगा तालुक्यात १.४० मिमी, लोहाऱ्यात १ मिमी तर कळंब तालुक्यात १.३३ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुके कोरडे राहिले.
दरम्यान, आॅगस्ट महिना संपत आला तरी जिल्हाभरात अत्यल्प पाऊस झालेला असल्याने पाणीसाठे वेगाने खालावत आहेत. पर्यायाने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करीत असल्याचे चित्र आहे. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. यंदा तर सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नसल्याने उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी जपून वापर करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)