रेल्वे व्यवस्थापकांनी घेतली झाडाझडती
By Admin | Updated: July 12, 2014 01:17 IST2014-07-12T00:00:23+5:302014-07-12T01:17:24+5:30
जालना: दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांच्या शुक्रवारी दुपारी येथील स्थानक परिसरातील तपासणी
रेल्वे व्यवस्थापकांनी घेतली झाडाझडती
जालना: दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांच्या शुक्रवारी दुपारी येथील स्थानक परिसरातील तपासणी दौऱ्यात पिण्याच्या पाण्यासह स्वच्छता तसेच खाद्य पदार्थांच्या दर्जात आनंदीआनंद आढळून आला. त्यामुळे संतप्त व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली.
व्यवस्थापक शर्मा हे सकाळी अकरा वाजता रेल्वेस्थानकावर दाखल झाले. ते येणार याची अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना होती. त्यामुळेच सर्व ताफा सज्ज होता. परंतु शर्मा यांनी स्थानकांत उतरल्याबरोबर थेट प्रवाशांबरोबर हितगुज सुरु केले. स्वत: प्लॉटफॉर्मवरील तसेच रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी सुरु केली. यावेळी काही फुकटे प्रवासी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरु असतानाच शर्मा यांनी अचानक स्थानकावरील स्वच्छतेकडे मोर्चा वळविला. प्लॉटफॉर्म, लोहमार्ग, दादरा तसेच स्थानकाबाहेरील परिसराचीही पाहणी केली. लगेचच दोन्ही कँटीनला भेटी दिल्या. पिण्याच्या पाण्याची स्टँडचीही तपासणी केली. यावेळी काही खटकलेल्या गोष्टींची दखल घेतली.
चहा आणि नाश्ता मानकांनुसार नसल्याने अन्न व औषधी प्रशासनाकडून तपासणी करावी असे आदेश शर्मा यांनी दिले. स्वच्छतेचे काम काटेकोरपणे झाले पाहिजे, त्यात कोणतीही हयगय करु नये अशा सूचना बजावल्या. यावेळी उपव्यवस्थापक ए.एन. रेड्डी, सहायक व्यवस्थापक मऊउल्ला, खालीककुमार, कनिष्ठ अभियंता लालू दास, स्थानक प्रमुख विजयकुमार वळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)