रेल्वेगेट बंद करणारच...
By Admin | Updated: March 31, 2015 00:35 IST2015-03-30T23:58:17+5:302015-03-31T00:35:44+5:30
जालना : शहरातील नूतन वसाहत उड्डाणपुलाखालील रेल्वेगेट बंद करण्याच्या निर्णयावर रेल्वे प्रशासन ठाम असून हे गेट सुरू ठेवायचे असल्यास

रेल्वेगेट बंद करणारच...
जालना : शहरातील नूतन वसाहत उड्डाणपुलाखालील रेल्वेगेट बंद करण्याच्या निर्णयावर रेल्वे प्रशासन ठाम असून हे गेट सुरू ठेवायचे असल्यास नगरपालिकेने स्वखर्चातून त्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. मात्र, यासंबंधी या परिसरातील नागरिकांनी गेट बंद करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी उद्यानजवळील उड्डाणपूल, मुक्तेश्वर तलाव, नूतन वसाहत उड्डाणपूल आणि रेल्वेस्थानक परिसर असे चार रेल्वेगेट एक कि़मी. अंतराच्या आत आहेत. यामध्ये संभाजी उड्डाणपुलाजवळील गेट मागील काही वर्षांपासून बंद आहे. मात्र अन्य तीन रेल्वेगेटवर रेल्वे प्रशासनाला प्रतिवार्षिक ६० लाख रुपये खर्च करावा लागतो.
नूतन वसाहत उड्डाणपुलाखालील गेटजवळ यापूर्वी अपघाताच्या काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांनी नूतन वसाहतजवळील गेट बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला. या प्रस्तावास मंजुरी मिळवून सदरील गेट बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
याबाबत जालना रेल्वेस्थानक प्रमुख वळवी म्हणाले की, नांदेड विभागीय व्यवस्थापकांनी रेल्वे गेट क्रमांक ७७ हे बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास दिला होता. त्यानुसार गेट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. (प्रतिनिधी)
या रेल्वेगेटच्या मार्गावर वाहतुकीची सतत वर्दळ असते. विद्युत कॉलनी, सहकार बँक कॉलनी, मंमादेवीनगर, नूतन वसाहत इत्यादी परिसरात ये-जा करण्यासाठी बहुतांश वाहनधारक याच मार्गाचा वापर करतात. मात्र हे गेट बंद झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होणार असल्याचे सांगून या परिसरातील लोकांचा गेट बंद करण्यास विरोध असल्याचे नगरसेवक अशोक पवार यांनी सांगितले.
४याबाबत आ. अर्जुन खोतकर यांनीही गेट बंद करू नये, या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. यासंबंधी पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन सादर केले.