रेल्वे उड्डाणपुलास मिळाली मंजुरी
By Admin | Updated: September 30, 2014 01:25 IST2014-09-29T23:56:58+5:302014-09-30T01:25:00+5:30
परतूर: परतूर-आष्टी रस्त्यावरील रेल्वेगेटवर उड्डाणपुलास मंजुरी मिळाली असून अनेक वर्षांपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीचा तिढा कायमचा सुटणार आहे.

रेल्वे उड्डाणपुलास मिळाली मंजुरी
परतूर: परतूर-आष्टी रस्त्यावरील रेल्वेगेटवर उड्डाणपुलास मंजुरी मिळाली असून अनेक वर्षांपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीचा तिढा कायमचा सुटणार आहे.
परतूर - आष्टी रस्त्यावरील रेल्वेगेटवर उड्डाणपुलास शासनाची मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ४० कोटी रू. निधीही मंजूर करण्यात आला आहे. राज्य महामार्ग १७४ कि मी. ६४२०० रेल्वेगेटजवळ असे रस्त्याचे नाव आहे. केंद्रिय मार्ग निधीतून साठ टक्के व राज्य शासनाचे चाळीस टक्के असा वाटा आहे. रस्ते, पूल या कामासाठी ३० कोटी व अतिक्रमण हटविण्यासाठी १० कोटींची मागणी करण्यात आली होती. कामाच्या मंजुरीसाठी अंदाजपत्रक करण्याचे काम सुरू आहे. मंजुरी मिळताच कामास सुरूवात होणार आहे. परतूर आष्टी रोड व पारडगावकडे जाणारा मार्ग या दोन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. रेल्वेच्या वेळात गेट लागल्यास तासन् तास वाहतुकीची कोंडी होते. दोन्ही बाजूस वाहने थांबल्याने गाडी जाताच वाहने काढण्यासाठी मोठी चढाओढ लागते यातून अपघातही होतात. अनेकदा रेल्वे गेट बंद असल्याने ग्रामीण भागातून येणारे रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या उडडणपुलामुळे वारंवार होणारी वाहतूक जामचा तिढा सुटणार आहे. वेळेतही बचत होणार आहे. हा उड्डाणपूल आनंदवाडी फाटा येथून सुरू होऊन पुढे गीतांजली हॉटेलजवळ होणार आहे. रेल्वे स्टेशनजवळ वरफळ नाका पर्यंत याचे टोक राहणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. (वार्ताहर)