रेल्वे भाडेवाढ : ‘उलटे दिन आ गये’
By Admin | Updated: June 21, 2014 01:00 IST2014-06-21T00:40:29+5:302014-06-21T01:00:37+5:30
औरंगाबाद : केंद्रातील भाजपा सरकारने आज रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्के एवढी मोठी वाढ केली.
रेल्वे भाडेवाढ : ‘उलटे दिन आ गये’
औरंगाबाद : केंद्रातील भाजपा सरकारने आज रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्के एवढी मोठी वाढ केली. याविषयी शहरातील उद्योजक, व्यापारी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. काहींचे मत मालवाहतूक वाढल्याने महागाईत वाढ होईल, असे होते तर काहींनी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी भाडेवाढ आवश्यक होती, असे मत व्यक्त केले.
भाडेवाढ केली आता सुविधा वाढवा
केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतूक भाड्यात वाढ केली. ही भाडेवाढ आवश्यक होती. कारण, मागील १० वर्षांपासून भाडेवाढ झाली नव्हती. मात्र, आता रेल्वेने आपल्या सेवेची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. रेल्वेने माल वेळेवर पोहोचविणे, ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे व रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी चांगले वागावे हीच अपेक्षा आहे.
-मानसिंग पवार,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर
‘उलटे दिन आ गये’
रेल्वे प्रवास भाडे व मालवाहतूक भाड्यात वाढ झाल्याने ‘अच्छे दिन नव्हे, तर उलटे दिन आ गये’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मालवाहतूक भाडेवाढीने कच्च्या मालाचा भाव वाढून उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. आधीच मंदीचे वातावरण आहे. उत्पादन खर्च कमी करून वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न होत असताना त्यात मालवाहतूक भाडेवाढीने उद्योजकांना उत्पादन खर्च व उत्पादनाची किंमत यात ताळमेळ बसविणे कठीण जाणार आहे.
-भारत मोतिंगे, अध्यक्ष, मासिआ
रेल्वेचा नियोजनशून्य कारभार
रेल्वेचा कारभार नियोजनशून्य बनला आहे. वेळेवर मालगाडी येत नाही. माल उतरून घेण्यासाठी सुविधा नाही. मोठे गोदाम नाहीत. एवढेच नव्हे तर संपूर्ण मालगाडीतून माल उतरून घेण्यासाठी ६ तासांची वेळ दिली आहे. ही वेळ ८ तासांपर्यंत वाढविण्यात यावी. केंद्र सरकारने मालवाहतुकीत भाडेवाढ केली तेव्हा याचा विचारही करणे आवश्यक आहे. भाडेवाढ केली तर चांगली सुविधा पुरवणे आता रेल्वे विभागाचे काम आहे.
-फय्याजखान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना
पायाभूत सुविधेवर खर्च होणार असेल तर ठीक
केंद्र सरकारने रेल्वे प्रवास व मालवाहतूक भाड्यात वाढ केली आहे. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. मिळणारी रक्कम पायाभूत सुविधेवर खर्च करण्यात येणार असेल तर भाडेवाढ ठीक आहे. कारण, रेल्वेची सेवा चांगली होण्यासाठी पायाभूत सुविधा वाढणे आवश्यक आहे. चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील.
-अजय शहा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
उत्पादन खर्च वाढणार
रेल्वेच्या मालवाहतूक भाड्यात तब्बल ६.५ टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम, उत्पादन खर्च वाढीत होणार आहे. कारण, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल रेल्वेनेसुद्धा आणला जातो. या भाडेवाढीने कच्च्या मालाचे भाव वाढतील तसेच उत्पादन खर्च वाढेल. शहरातील आॅटोमोबाईल हबमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्यात होते. यामुळे निर्यात खर्चातही वाढ होईल. मंदीच्या काळात उद्योगांना याचा मोठा फटका बसेल.
-मुनीष शर्मा, उपाध्यक्ष, सीएमआयए
महागाई वाढणार
लालूप्रसाद यादव यांनी प्रवासी व मालवाहतूक भाडेवाढ न करता रेल्वेला नफ्यात आणले होते. आताही नवीन केंद्र सरकारकडून हीच अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अचानक दुहेरी भाडेवाढ करून भारतीय जनतेला मोठा धक्काच दिला आहे. यामुळे महागाई वाढेल. स्पर्धेच्या व मंदीच्या काळात अशी भाडेवाढ करणे चुकीचे आहे.
-सुनील किर्देक सचिव,
मासिआ
जनतेची फसवणूक
‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत जनतेची मते घेतलेल्या भाजपा सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतूक दरात वाढ करून जनतेची मोठी फसवूणक केली आहे. या दुहेरी भाडेवाढीने जनतेचे कंबरडे मोडेल. या भाडेवाढीचा केंद्र सरकारने फेरविचार करणे आवश्यक आहे. नसता जनता येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानातून आपल्या संतप्त भावना व्यक्त करील.
-शिवनाथ राठी, ज्येष्ठ समाजसेवक
रेल्वे भाडेवाढप्रकरणी युतीचे तोंड बंद
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे भाड्यात दरवाढ केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अनेकांचे फोन बंद होते, तर काहींना काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न पडला. यापूर्वी १ रुपयाने दरवाढ झाली तर आंदोलनाने निषेध केला जायचा आणि आता एवढी जबर दरवाढ केल्यावर काय बोलावे हे कळत नसल्याचे मतही काहींनी व्यक्त केले. खा. चंद्रकांत खैरे यांच्याशी संंपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजपा शहराध्यक्ष भगवान घडामोडे हे प्रतिक्रि येसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
केंद्रीय अर्थसंकल्प कसा असेल, त्याचे संकेत
केंद्र सरकारने एकदाच मोठ्या प्रमाणात रेल्वे भाडेवाढ करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण, नवीन सरकारकडून सर्वांना मोठी अपेक्षा होती. भाडेवाढ होणे अपेक्षित होते; पण एकदम मोठी वाढ सर्वसामान्यांना न परवडण्यासारखी आहे. या भाडेवाढीने आगामी केंद्रीय अर्थसंकल्प कसा असेल, याचे संकेत मिळाले आहेत. -आदेशपालसिंग छाबडा,
अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ