रेल्वेची भाडेवाढ झाली ; सुविधांचे काय ?
By Admin | Updated: June 24, 2014 00:01 IST2014-06-23T23:58:41+5:302014-06-24T00:01:38+5:30
हिंगोली : रेल्वे अर्थसंकल्पास पंधरवाडा शिल्लक असताना केंद्र शासनाने भाडेवाढ करून महागाईचा पहिला धक्का जनतेला दिला आहे.
रेल्वेची भाडेवाढ झाली ; सुविधांचे काय ?
हिंगोली : रेल्वे अर्थसंकल्पास पंधरवाडा शिल्लक असताना केंद्र शासनाने भाडेवाढ करून महागाईचा पहिला धक्का जनतेला दिला आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या एकदाच केलेल्या भाडेवाढीबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जनतेला मोठ्या आशा दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपने जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरल्याचा नागरिकांनी सूर काढला. परिणामी मालवाहतुकीच्या भाडेवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर आणखीच वाढून महागाईची दाहकता सर्वसामान्यांना सोसावी लागणार आहे.
एकीकडे भाढेवाढ केली असली तरी रेल्वेस्थानक आणि सोयी-सुविधांच्याबाबतीत स्थानकाची अवस्था जैैसे थे आहेत. हिंगोली स्थानकात महिलांची सुरक्षा, फेरीवाल्यांचा त्रास, अस्वच्छता, खुलेआम गुटखा विक्री, फुकट्या प्रवाशांची बोकाळेलेली संख्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. याहीपेक्षा हिंगोली-नांदेड रोडवरील खटकाळी बायपासजवळचा उड्डाणपूल, जिल्ह्यातील छोट्या स्थानकाची बकाल अवस्था आणि वसमत स्थानकात थांबत नसलेल्या गाड्या या प्रलंबित प्रश्नाचा पाडा प्रवाशांकडून वाचला जात आहे. ज्याप्रमाणे रेल्वेभाडेवाढ केली त्याप्रामाणे पुढील महिन्यात येणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून सोयी-सुविधा देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
जनतेचा विश्वासघात- प्रा. शत्रुघ्न जाधव
ज्या विश्वासाने, आशेने सर्वसामान्य जनतेने नरेंद्र मोदी सरकारला निर्विवाद बहूमताने निवडून दिले, ते नेमके महागाईच्या मुद्यावरच; पण नुकत्याच केलेल्या रेल्वे भाडेवाढीमुळे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचे दिसून आले.
भाडेवाढीप्रमाणे नवीन रेल्वे सोडा-माया साहू
नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच भाढेवाढ करून सामान्यांचा झटका दिला आहे. आता जरी भाडेवाढ केली असली तरी राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपुरला जोडणारी दैनिक एक्सप्रेस गाडी ही हिंगोली मार्गे सोडावी. शिवाय सुरत, अहमदाबाद, वाराणसी, बौद्धगया आदी ठिकाणी नव्या गाड्या येणाऱ्या अर्थसंकल्पात सोडण्याची मागणी आहे.
भाडेवाढीचा पैैसा सत्कार्णी लावा- सचिन पत्तेवार
ज्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली, त्या प्रमाणात रेल्वेची देखरेख व दुरूस्ती करून सुविधा द्याव्यात. जनतेच्या खिश्यातून घेतलेल्या पैैशांत पादचारी पुलाची डागडुजी, प्रलंबित रेल्वे उद्याणाचा प्रश्न मार्गी लावावा. स्थानकासमोर वाहनतळ उभारून आॅटो चालकांना शिस्त लावावी. रात्रीच्या वेळी महिलांना सुरक्षा प्रदान करावी. जनतेचा पैैस सत्कार्णी लावावा, अन्यथा जनता माफ करणार नाही.
...तर कमी होईल अंतर- सुप्रिया पतंगे
दोन वर्षांपूर्वी वसमत-चुडावा बायपास रेल्वेमार्ग मंजूर झाला होता. जर हा मार्ग उभारला तर अनेक रेल्वेगाड्यांचे इंधन बचत होवून प्रवासासाठी कमी वेळ लागेल. म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पात तरी वसमत-चुडावा बायपास मार्ग उभारण्यास मंजुरी मिळावी.
भरपाई कोठून करणार- संतोष साहू
सडक परिवहन मार्गाचे भाडे रेल्वेच्या तुलनेत ५ पटीने अधिक आहेत. उलट स्वस्त आणि मस्त प्रवास असतानाही रेल्वेचे तिकीट अत्यंत कमी आहे. परिणामी शासनाला नियमित ९०० कोटी रूपयांचा फटका बसत असल्यामुळे ही भाडेवाढ करावी लागली. जर भाडेवाढ केली नसली तर शासनावर बोजा वाढत जावून एकदाच मोठी भाडेवाढ करावी लागली असती.
भाडेवाढीने जनतेची निराशा-उज्वला तोळमारे
वाढलेल्या महागाईच्या विरोधात जनतेने भाजपला मत देवू सत्तेत आणले; परंतु सरकार स्थापून महिना लोटताच केलेल्या भाडेवाढीमुळे भाजपने जनतेचा विश्वासघात केला आहे. आता महागाई अटोक्यात येईल, ही अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. या भाडेवाढीने जनतेची निराशा झाली आहे.
सुरक्षेचा अभाव फेरीवाल्यांचा ताप
सडक परिवहन महामंडळाच्या तुलनेत पाच पटीने रेल्वेचे भाडे कमी आहेत. म्हणून रेल्वेकडे सर्वसामान्य माणसांचा ओढा असल्यामुळे नेहमी गाड्या गच्च असतात. कधी-कधी पाय ठेवायलाही जागा नसताना फेरीवाल्यांची घाई प्रवाशांना तापदायक ठरते. गर्दीत वाट काढीत फेरीवाले रेल्वेत फिरतात. आजघडीला गुटखा, मावा याची खुलेआम विक्री रेल्वेत होत आहे. गुटखा बंदी करूनही रेल्वेत हा प्रकार सुरू असताना पोलिसांकडून त्याची तपासणी होत नाही. शिवाय भिकारी आणि तृतीय पंथींचा त्रासही प्रवाशांना सोसावा लागतो. प्रवाशांचे जबरदस्तीने पैसे हिसकाटून घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी रेल्वेत महिला असुरक्षीत असताना भुरटे चोरांचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांनी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रतीक्षालयास कुलूप, एकाच तिकीटघर
हिंगोलीतील दोन्हीही व्हीआयपी प्रतीक्षालयास नेहमी कुलूप पहावयास मिळते. स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना होत आहे. सर्वसाधारण प्रतीक्षालयात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे त्यात जाण्यास प्रवासी धजावत नाहीत. दुसरीकडे एकाच तिकीट घरामुळे अनेकांना तिकीट मिळत नाहीत. नेहमी मोठ्या रांगा तिकीट घरासमोर लागलेल्या असतात. त्यावरच आरक्षण आणि प्रवासांना तिकीटासाठी ताटकळत बसावे लागते. म्हणून दोन तिकीटघर उभारण्याची मागणी आहे.
उड्डाण पुलाची प्रतीक्षा
प्रतिवर्षीच्या अर्थसंकल्पापूर्वी हिंगोली-नांदेड रोडवरील खटकाळी बायपास जवळच्या रेल्वे उड्डाणपुलाची मागणी जोर धरते; पण अर्थसंकल्पात हिंगोलीकरांची साप नाराजी होते. हिंगोलीतून नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावत आहे. योगायोगाने फाटकाच्या पल पुढे राज्य राखीव बलगट स्थापना झाल्यामुळे पोलिसांच्या वाहनांची ये-जा अधिक असते. त्यातच रेल्वेची संख्या वाढल्याने प्रत्येक अर्ध्या किवा एका तासाला रेल्वे असल्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा पहावयास मिळतात. दिवसेंदिवस वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण वाढत असताना राजकारणी, बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन या प्रश्नाची टोलवाटोलवी करीत आहे. परिणामी मागील सहा वर्षांपासून हा प्रश्न सुटलेला नाही.
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण
हिंगोली स्थानकाकडे जेवढी मोकळी जागा आहे, तेवढी जागा मराठवाड्यातील कोणत्याही स्थानकाकडे नाही. स्थानकाच्या चारीही बाजूंनी असलेल्या मोकळ्या जागेचा फायदा रेल्वे प्रशासनास करून घेता आलेला नाही. परिणामी या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत गेले. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढत असताना रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता उर्वरित जागेवर होत असलेले अतिक्रम रोखण्यासाठी जागेचे मोजमाप करून कंपाऊंड वॉल बांधण्याची आवश्यकता आहे. अन्यथा रेल्वेच्या नकाशावरून ही जागा हळूहळू कमी-कमी होत जाईल.
कोल्ड स्टोअरेज आणि गोदामाची गरज
व्यापाराबाबत पहिल्यापासून हिंगोली जिल्हा आघाडीवर आहे. आजघडीला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कच्चा मालाची वाहतूक होते. सोयाबीन, कापसाच्या गाठी, हळद परराज्यात रेल्वेद्वारे नेली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना आणि जाागेची उपलब्धता असताना मालासाठी गोदाम व साठवणुकीसाठी शीतग्रह उभारण्यात आलेले नाही. स्थानकाजवळ गोदाम आणि शीतग्रह उभारल्यास हिंगोलीतून थेट मुंबई, दिल्ली, नागपूर महानगरात माल विक्रीसाठी नेता येईल. शिवाय गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीत देखील माल विक्री करता येणार आहे. त्यातून शेतकरी, व्यापारी आणि रेल्वेचा देखील फायदा होईल. आता केलेल्या भाडेवाढीच्या पैैशातून हिंगोलीसारख्या ठिकाणी गोदाम आणि शितग्रह उभारावे, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
सोयी-सुविधांकडे कानाडोळा
११ नोव्हेंबर २००८ साली हिंगोली-पूर्णा मार्गाचे उद्घाटन होवून सहा वर्ष लोटत असताना स्थानकात स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्याची टाकी नियमित साफ केली जात नसल्याने नळाचे पाणी प्रवाशांना प्यावेसे वाटत नाही. उन्हाळ्यात अंगोळीच्या पाण्यासारखे गरम पाणी पिण्याचा प्रश्न येत नाही. प्रारंभीपासून ही समस्या आजतागायत कायम आहे. स्थानकात कोच इंडीकेटर नावालाच असल्याने प्रवाशांना डब्बे कळत नाहीत. साध्या रेल्वे गाड्यांना कोच इंडीकेटर लावलेही जात नाहीत. परिणामी जागेसाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते. दुसरीकडे बोल्डा, कनेरगाव, नांदापूर, चौंढी आदी रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील लहान-सहान स्थानकाची दुरूस्ती, शुशोभीकरण करून प्रवाशांना सुविधा देण्याची मागणी होत आहे.