धारूरमध्ये दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:09 IST2017-05-06T00:07:05+5:302017-05-06T00:09:29+5:30
धारूर : शहरातील शिक्षक कॉलनी भागामध्ये एका विमा एजंटाच्या घरात प्रवेश करून सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सव्वादोन लाख रूपयांचा ऐवज लंपास केला

धारूरमध्ये दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : शहरातील शिक्षक कॉलनी भागामध्ये एका विमा एजंटाच्या घरात प्रवेश करून सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सव्वादोन लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी रात्री घडली.
शिक्षक कॉलनीत दिलीप बडे हे भाड्याच्या घरात कुटुंबियांसमवेत राहतात. दरवाजा उचकटून सात जण घरात घुसले. बडे दाम्पत्यास जाग आल्यानंतर ते भयभीत झाले. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतले. यावेळी दरोडेखोरांनी आरडाओरड करू नका, अन्यथा याद राखा, असा दम देत चाकू, गजाचा धाक दाखवून कपाटातील सामानाची उचकापाचक केली. बडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. रोख रक्कम व दागिने असा दोन लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पळाले. यानंतर बडे यांनी धारूर पोलिसांना कळविले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी अतिरिक्त अधीक्षक अजित बोराडे, उपअधीक्षक मंदार नाईक यांनी भेट दिली.
स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, ठसेतज्ज्ञ, श्वानपथकही पाचारण केले होते. मात्र, रात्रीपर्यंत दरोडेखोरांचा सुगावा लागला नव्हता. याच रात्री गणेश थोरात यांची पानटपरी फोडून चोरांनी हजार रूपयाचे साहित्य लंपास केले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.