जिल्ह्यात हातभट्टय़ांवर धाडी
By Admin | Updated: August 31, 2015 13:21 IST2015-08-31T13:21:04+5:302015-08-31T13:21:04+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टय़ांवर टाकलेल्या धाडीत ३३ हजारांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात हातभट्टय़ांवर धाडी
लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टय़ांवर टाकलेल्या धाडीत ३३ हजारांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. या धाडसत्रात एकूण सात जणांना पथकाने अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही मोहीम २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आली.
लातूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध दारु विक्री होत असल्याने, दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या हातभट्टय़ांवर धाडी टाकून ३३ हजारांची अवैध दारु जप्त करुन, सात जणांना ताब्यात घेतले. रेणापूर तालुक्यातील केळगाव तांडा येथे पथकाने टाकलेल्या धाडीत शालू राठोड, सविता राठोड, अंकुश राठोड आणि अन्य एक जण असे एकूण चार जण अवैध हातभट्टी दारुविक्री करीत असताना आढळून आले. लातूर तालुक्यातील वसंतनगर तांड्यावर ८00 लिटर रसायन आढळले. या अवैध दारुविक्रीच्या मोहिमेत २६ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाढवणा (बु.) परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दयानंद अण्णाराव कंजे यांच्याजवळ देशी दारुच्या ४५ बाटल्या, सचिन विठ्ठल भांगे ३५ बाटल्या, शादुल वजीर शेख यांच्याजवळ ५0 बाटल्या सापडल्या आहेत. १३५ लिटर एमएलच्या १३0 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी तिघांसह अन्य चार जणांना पथकाकडून अटक केली आहे. या सात जणांकडून ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (प्रतिनिधी)