रोहयोतील खाबूगिरी प्रशासनाच्या रडारवर
By Admin | Updated: May 21, 2017 23:51 IST2017-05-21T23:48:51+5:302017-05-21T23:51:19+5:30
बीड : जिल्ह्यात कागदावर मजूर दाखवून मग्रारोहयोमध्ये खाबूगिरी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीतच उघडकीस आले

रोहयोतील खाबूगिरी प्रशासनाच्या रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कागदावर मजूर दाखवून मग्रारोहयोमध्ये खाबूगिरी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीतच उघडकीस आले आहे. त्यामुळे मग्रारोहयो गावपुढाऱ्यांसाठी कुरण बनल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेतील बोगसगिरी प्रशासनाच्या रडारवर असून, तक्रार आल्यास कारवाई अटळ आहे. त्यामुळे बोगसगिरी करणाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या मग्रारोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी बीड तालुक्यातील नेकनूर, कळसंबर, भंडारवाडी येथील कामांना दिलेल्या पाहणीदरम्यान अनियमितता आढळून आली. त्यानंतर भागवत यांनी गटविकास अधिकारी रवींद्र तुरूकमारे यांना संबंधित गावांमध्ये आढळलेल्या अनियमिततेनुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे अंबाजोगाईत देखील तहसीलदार शरद झाडके यांनी मग्रारोहयोच्या कामांची झाडाझडती घेतली. तेथेही ७० गावांमध्ये मजूर नसल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे मस्टरवर शेकडो मजुरांची नोंद असताना कामावर मात्र एकही मजूर नसल्याने रोहयोतील खाबूगिरी उघड झाली आहे. त्यांनी देखील कारवाईचा प्रस्ताव दिलेला आहे.
जिल्ह्यात आजघडीला १२०० हून अधिक कामे सुरू असून, त्यावर ४१ हजारांपेक्षा मजूर कामाला असल्याची नोंद आहे. एका मजुराला २०० ते २५० रूपये मजुरी दिली जाते. कागदोपत्री मजूर दाखवून शासन निधीवर डल्ला मारला जात असल्याने मग्रारोहयोमध्ये मागचाच कित्ता पुन्हा गिरवला जात असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी सर्व अनियमिततेची माहिती मागविली आहे. त्यामुळे अनियमितता करणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत.