रोष अन् उद्रेक...!
By Admin | Updated: May 22, 2017 23:33 IST2017-05-22T23:26:31+5:302017-05-22T23:33:41+5:30
बीड : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रोष अन् उद्रेक...!
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केज, अंबाजोगाई, शिरूर वगळता इतर ठिकाणी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तिडकेच्या वक्तव्याबद्दल सामान्यांत प्रचंड संताप अन् उद्रेक दिसून आला. बंददरम्यान बीडमध्ये १५ ठिकाणी तोडफोड झाली. हिंसक वळण मिळाल्याने बंदला गालबोट लागले. रॅलीतील तरुणांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी शंभरावर कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद केले असून अनेकांची धरपकड केली.
विठ्ठल तिडकेच्या अटकेमुळे सोमवारचा बंद शांततेत होईल, असा पोलीस प्रशासनाचा अंदाज संतप्त तरुणांनी फोल ठरविला. सर्व पक्ष- संघटनांचे पदाधिकारी- कायकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते. सकाळपासूनच अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूतीने बंदमध्ये सहभाग नोंदविला. सकाळी ११ वाजता तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. कोणा एकाच्या नेतृत्वाशिवाय निघालेल्या या रॅलीतील तरुणांनी संपूर्ण शहराला वळसा घालून बंदचे आवाहन केले. रॅली सुभाष रोडवर आल्यानंतर काही कार्यकर्ते वेगवेगळ्या दिशेने गेले. त्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांचा पाठलाग केला. शहरात एकूण २५ ठिकाणी पोलिसांचे पॉर्इंट लावण्यात आले होते. याशिवाय फिरते गस्त पथकही हालचालींवर लक्ष ठेवून होते. शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे, पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव बंदोबस्तकामी रस्त्यावर उतरले होते. अधीक्षक जी. श्रीधर हे देखील बारीकसारीक माहिती जाणून घेत परिस्थिती नियंत्रणात आणत होते.
दरम्यान, शहरातील सर्व भागांतील दुकाने सायंकाळपर्यंत बद होती. दगडफेकीच्या घटनेनंतर सर्व रस्ते सूनसान होते. सायंकाळनंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले.