अंबाजोगाईमध्ये धाडसी चोरी

By Admin | Updated: July 3, 2017 00:55 IST2017-07-03T00:53:53+5:302017-07-03T00:55:34+5:30

अंबाजोगाई : शहरातील यशवंतराव चव्हाण चौकलगतच्या अमृत नगरमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ जगदीशराव देशपांडे यांच्या घरी चोरी झाली

Radical theft in Ambajogai | अंबाजोगाईमध्ये धाडसी चोरी

अंबाजोगाईमध्ये धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहरातील यशवंतराव चव्हाण चौकलगतच्या अमृत नगरमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ जगदीशराव देशपांडे यांच्या घरी चोरी झाली. यामध्ये पावणेचार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. भरवस्तीत ही चोरी झाल्याने अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे.
यशवंतराव चव्हाण चौकालगतच्या अमृतनगर या गजबजलेल्या कॉलनीमध्ये जगदीशराव देशपांडे यांचे घर आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीची जाळी काढून खोलीत प्रवेश केला. त्यानंतर खोली आतून बंद केली. त्याच खोलीतील कपाट उघडून त्यातील चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, तीन तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे गंठन, तीन तोळ्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे लहान मुलाचे लॉकेट आणि बदाम, कानातील सोन्याच्या काड्या, दीड तोळ्याचा वेल, सरपाळी आणि ठुशी इतर चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ६७ हजार २८२ रूपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी पाच वाजता जगदीश देशपांडे फिरायला जाण्यासाठी निघाले असता कपडे घेण्यासाठी सदरील खोली उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु आतून बंद असल्याने दरवाजा उघडला नाही. नंतर त्यांनी मागच्या बाजूने पाहिले असता त्यांना हा प्रकार समोर दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते, सहायक पोलीस निरीक्षक नाईकवाडे, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु विशेष काही हाती लागले नाही. याप्रकरणी एसबीआय बँकेत अधिकारी असणारे मंदार जगदीशराव देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Radical theft in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.