राधास्वामी कॉलनीत तीन घरे फोडली
By Admin | Updated: November 8, 2016 01:23 IST2016-11-08T01:19:10+5:302016-11-08T01:23:17+5:30
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र जोरात सुरू आहे. पोलिसांची गस्त कमी झाल्याने चोरटे बंद घरांना

राधास्वामी कॉलनीत तीन घरे फोडली
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र जोरात सुरू आहे. पोलिसांची गस्त कमी झाल्याने चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत. हर्सूल परिसरातील राधास्वामी कॉलनीत चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरे फोडून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांनी सांगितले की, राधास्वामी कॉलनीतील रहिवासी बापू नागे हे आठवडी बाजारात किराणा दुकानाचा व्यवसाय करतात. दिवाळीनिमित्त नागे कु टुंब ४ नोव्हेंबर रोजी सराई (ता. सिल्लोड) येथे गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांचे घर फोडले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज पळविला. रविवारी सकाळी नागे यांच्या शेजाऱ्यांनी चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांना फोन करून कळविले.
यासोबतच नागे यांच्या शेजारीच त्यांच्या भावाचे घर आहे. त्यांचे भाऊही गावाला गेलेले असून, चोरट्यांनी तेही घर फोडले. तसेच याच भागातील अन्य एक घर फोडून चोरट्यांनी ऐवज चोरून नेला. माहिती मिळताच हर्सूल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, बजाजनगरातील प्रतीक डिजिटल वर्ल्ड हे इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास दोन ते अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. महिनाभरात चोरट्यांनी दुसऱ्यांदा या दुकानास लक्ष्य केले. दोन्ही वेळेस चोरीची पद्धत सारखीच आहे.
बजाजनगरातील मुख्य रस्त्यावर सूरजितसिंग छाबडा यांचे प्रतीक डिजिटल वर्ल्ड हे इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे दुकान आहेत. दुकानमालक छाबडा रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून गेले होते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकानाचा पत्रा उचकटलेला दिसल्यामुळे लगतच्या मोबाईल विक्रेत्यांनी या घटनेची माहिती त्यांना दिली. माहिती मिळताच सूरजितसिंग छाबडा, हरप्रीतसिंग छाबडा यांनी दुकानात धाव घेतली. अज्ञात चोरट्याने छताचा पत्रा उचकटून दुकानातील किमती ६ ते ७ एलईडी टीव्ही संच, होम थिएटर चोरून नेले. मुख्य रस्त्यावर हे दुकान असून येथे मध्यरात्रीपर्यंत वर्दळ सुरूअसते. या दुकानाच्या दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या जागा असल्यामुळे चोरट्याने चोरी केल्याचे छाबडा यांनी सांगितले. चोरी झाल्याची माहिती मिळताच डीबी शाखेचे फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ वसंत शेळके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दुकानात लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य असल्यामुळे नेमका किती माल चोरीला गेला याची तपासणी सुरू असल्याचे दुकान मालकाचे म्हणणे आहे.
औरंगाबाद : फेसबुक, व्हॉटस्अॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर आता दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. मुकुंदवाडी येथे व्हॉटस्अॅपवरील एका पोस्टवरून झालेल्या वादातून रविवारी रात्री दगडफेकीची घटना घडली. यामुळे मुकुंदवाडी, संजयनगर, संघर्षनगर येथे रात्रभर तणाव निर्माण झाला होता.
अधिक माहिती अशी की, मुकुंदवाडी येथील एका तरुणाने त्याच्या व्हॉटस्अॅपवर आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट विविध ग्रुपवर फॉरवर्ड केली.
या पोस्टची माहिती मिळताच चार दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला. ज्या समाजाविषयी ही पोस्ट होती, त्या समाजाचे तरुण चार दिवसांपासून रोज त्याच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करीत होते. यामुळे त्याचे आई-वडील आणि घरातील मंडळी त्रस्त झाली होती.
याविषयी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी रात्री ही मंडळी पुन्हा त्या तरुणाच्या घरासमोर गेली आणि त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे शेजारील नागरिकांनी त्यांना पकडून बेदम चोप दिला. लोकांच्या तावडीतून ते पळून गेले आणि आणखी काही तरुणांना घेऊन आले. परिणामी तेथे दोन्ही समाजाचे गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण शांत झाले. रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.