बोगस बांधकाम परवानगीचे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 01:15 IST2016-07-11T01:06:46+5:302016-07-11T01:15:52+5:30

औरंगाबाद : महापालिकेत बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणारी टोळी मागील महिन्यात उघडकीस आली होती.

Racket of bogus construction permission | बोगस बांधकाम परवानगीचे रॅकेट

बोगस बांधकाम परवानगीचे रॅकेट

औरंगाबाद : महापालिकेत बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणारी टोळी मागील महिन्यात उघडकीस आली होती. या टोळीने शहरात अनेक बिल्डरांनाही बोगस बांधकाम परवानगी दिल्याचे समोर येत आहे. मात्र, पोलीस तपासात किती जणांना आणि कधी ही परवानगी दिली हे सापडत नाही. महापालिकेनेही यासंदर्भात कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही.
शेख रियाज (४०, रा. काळा दरवाजा), दशरथ आदमाने (५६, रा. रेणुकामातानगर, गारखेडा) आणि जयराम बुळे (४५, रा. विशालनगर, गारखेडा) यांनी सेव्हन हिल कॉलनी येथील रहिवासी प्रवीण चौधरी यांना बोगस भोगवटा प्रमाणपत्र दिले होते. या प्र्रकरणात ५ जून रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटकही केली होती. या टोळीने शहरात आणखी काही जणांना बोगस भोगवटा आणि बांधकाम परवानगी दिल्याचे समोर येत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून हा कुटीर उद्योग सुरू होता. प्रवीण चौधरी यांच्या जागरूकतेने या टोळीचा पर्दाफाश झाला होता.
बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीने काही बिल्डरांना चक्क बांधकाम परवानगीही बनवून दिली आहे. या बांधकाम परवानगीच्या आधारावर अनेक बँकांनी या बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचे कर्जही दिले आहे. सिटीचौक पोलिसांनी तपासात अनेक बाबींचा अभ्यास केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी सांगितले. आरोपींनी यापूर्वी काही जणांना असे बोगस प्रमाणपत्रे दिलेली आहेत. कोणाला दिले, कधी दिले हे समोर आलेले नाही. महापालिकेकडून यासंदर्भात अधिक तपशील कळविण्यात आलेला नाही.
महापालिकेत बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणारी टोळी असल्याचे उघडकीस आल्यानंतरही मनपा प्रशासनाने यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. मागील दोन-चार वर्षांमध्ये आणखी काही बोगस बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र दिल्याची तपासणी केली नाही. मनपाच्या नगररचना विभागाने बारीक तपासणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. कारण या टोळीने मनपाच्या रेकॉर्डमध्ये बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याच्या नोंदी करून ठेवल्या आहेत.

 

Web Title: Racket of bogus construction permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.