बीडमध्ये महसूलचे बोगस दाखले देणारे ‘रॅकेट’
By Admin | Updated: May 8, 2014 00:01 IST2014-05-08T00:00:47+5:302014-05-08T00:01:05+5:30
प्रताप नलावडे ल्ल बीड प्रमाणपत्र कोणतेही असो, जन्म-मृत्यूचे असो, जातीचे असो की उत्पन्नाचे अवघ्या काही मिनिटात ते तुम्हाला मिळू शकते.

बीडमध्ये महसूलचे बोगस दाखले देणारे ‘रॅकेट’
प्रताप नलावडे ल्ल बीड प्रमाणपत्र कोणतेही असो, जन्म-मृत्यूचे असो, जातीचे असो की उत्पन्नाचे अवघ्या काही मिनिटात ते तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला खिसा मात्र थोडासा सैल करावा लागेल. शहरात असे बोगस दाखले देणारे एक रॅकेटच कार्यरत असून दाखला बोगस असला तरी त्यावरची स्वाक्षरी आणि शिक्का मात्र अस्सल असतो. मात्र या दाखल्याची महसूलच्या दफ्तरी कसलीही नोंद नसते आणि यासाठीचे शुल्कही सरकारी तिजोरीत जमा होत नाही. महसूल खात्याकडून कोणतेही प्रमाणपत्र हवे असेल तर त्यासाठी कोणतेही सोपस्कार करण्याची गरज नाही. तुम्ही दोनशे ते तीनशे रूपये मोजायला तयार असाल तर अवघ्या काही मिनिटात हवे ते प्रमाणपत्र अधिकृत सही आणि शिक्यासह तुमच्या हातात पडू शकते. बीड शहरात असे प्रमाणपत्र देणारे एक रॅकेटच कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून महसूलचे अधिकारीही यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. दस्तूरखुद्द तहसीलदार ज्योती पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही असे प्रकार घडत असल्याचे मान्य केले असून कोणाकोणावर आम्ही लक्ष ठेवायचे असा सवाल करीत कोणी असे करीत असेल तर त्याची जबाबदारी माझी नाही तर त्या संबंधित कर्मचार्याची असल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. महसूलमधील कोणताही दाखला हवा असेल तर त्यासाठी सेतूमध्ये काही सोपस्कार करावे लागतात. अगदी उत्पन्नाचा दाखला हवा असेल तरी त्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. त्याचबरोबर रहिवाशी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आणि तलाठी यांचा दाखला हवा असतो. ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतरच उत्पन्नाचा दाखला सेतूमध्ये तयार करण्यात येतो आणि त्यानंतर तो सहीसाठी तहसील कार्यालयात जातो. तहसील कार्यालयात दाखल्यावर सही करताना अधिकारी ही सर्व कागदपत्रे आहेत की नाहीत याची खात्री करतात आणि त्यानंतर अधिकृत दाखला देण्यात येतो. बीडमध्ये मात्र असे काहीच करावे लागत नाही. असे कोणतेही सोपस्कार न करता तात्काळ दाखला मिळवून देणारी एक टोळीच शहरात कार्यरत असून अवघ्या काही मिनिटात हवा तो दाखला सही आणि शिक्यासह देण्यात येतो. विशेष म्हणजे या दाखल्याची कसलीच नोंद तहसील कार्यालयात करण्यात येत नाही परंतु त्या दाखल्यावर सही आणि शिक्का मात्र ‘असली’ असतो. दाखल्यावर बारकोडही देण्यात येतो. हा बारकोड आणि त्यावरील जावक क्रमांक मात्र ‘नकली’ असतो. शहरातील काही महा ई-सेवा केंद्रातून असे बोगस दाखले महसूलच्या आशीर्वादाने देण्यात येत असून यामुळे शासनाच्या लाखो रूपयांच्या महसूलला टोपी घातली जात आहे. कोणताही दाखला हवा असेल तर त्यासाठी ३५ रूपये लागतात. परंतु शहरातील सेतू कार्यालयात आणि महा ई- सेवा केंद्रात शासकीय फी पेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात. सोपस्कार करणार्यांनाही हे पैसे द्यावे लागतात आणि न करणार्यांनाही द्यावे लागत असल्याने अनेकजण थेट दाखला मिळविण्याचा मार्गच अवलंबतात. ती सही आणि शिक्का अस्सलच दाखले बोगस कसे मिळतात हे सप्रमाण सिध्द करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने स्वत:चाच उत्पन्नाचा दाखला मिळविला. अवघ्या दोनशे रूपयात कोणतीही कागदपत्रे न देता हा दाखला अवघ्या दहा मिनिटात देण्यात आला. हा दाखला आणि इतरही काही दाखले तहसीलदार ज्योती पवार यांना दाखविल्यानंतर त्यांनी त्यावरील सही नायब तहसीलदार पद्मावती बुंदले यांची असल्याचे सांगितले. कागदपत्रांची तपासणी न करता असा दाखला देता येतो का असे विचारल्यावर पवार म्हणाल्या, त्या कर्मचार्यांनी कसा काय दिला हे सांगता येणार नाही मात्र असे घडत असेल तर त्याची जबाबदारी माझी नाही. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात सेतूच्या माध्यमातून दाखले देण्याचे काम करण्यात येते. याशिवाय शहरातही पाच महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून दाखले देण्यात येतात. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक सज्जाला एक महा ई-सेवा केंद्र असून याठिकाणीही दाखले दिले जातात. उत्पन्नाचा, जन्ममृत्यूचा, रहिवासी, जातीचा, गुन्हेगार नसल्याचा, असे विविध दाखले या केंद्रातून देण्यात येतात.