रबी क्षेत्र वाढणार दुपटीने
By Admin | Updated: September 17, 2015 00:32 IST2015-09-17T00:00:13+5:302015-09-17T00:32:23+5:30
राजेश खराडे , बीड जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

रबी क्षेत्र वाढणार दुपटीने
राजेश खराडे , बीड
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७९ हजार हेक्टर ऐवढे आहे. खरीपाच्या पिकांची मोड झाल्याने रबी हंगामात २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामावरच अवलंबून असते. गेल्या दोन वर्षापासून खरीपाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कापूस हे मुख्य पिक असून यामधूनच अधिकचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस असतो. गतवर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. तर यंदा खरीपात पावसाने ओढ दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या जोरावर केवळ दीड महिन्याच्या कालावधीत सरासरीइतका खरीपाचा पेरा झाला होता. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिके उगवण्याच्या आगोदरच मोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. अद्यापपर्यंत केवळ २५ दिवस पाऊस झाला असून ७५ दिवस हे निरंक गेले आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २ लाख ३४ हजार हेक्टरवरील खरीपातील पिकांची मोडणी करण्यात आली होती. मात्र उर्वरीत पेऱ्यातून उत्पादन तर सोडाच जनावरांसाठी साधा चारा देखील झाला नाही. त्यामुळे खरीपातून उत्पादन तर सोडाच मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४०९ कोटी रुपायांचा फटका बसला आहे. आर्थिक फटका व खरीपाच्या मोकळ्या क्षेत्रातून उत्पादन घेण्याच्या उद्देशाने जवळपास अडीच लाख हेक्टर रब्बी क्षेत्र वाढणार असून रब्बी ज्वारी, गहू या पिक लागवडीत वाढ होणार असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षी रब्बीची २ लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
चाऱ्याचाही उद्देश
रब्बीचे नुकसान व पावसाळ्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने जिल्ह्यात चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बीतून उत्पादनाबरोबर चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लावण्याचा दुहेरी हेतू बाळगला जात आहे. सध्या वैरण विकास प्रकल्पाअंतर्गत सुमारे १३८०० हेक्टरवर पुरेल ऐवढे बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आले आहे.
नियोजन कागदावरच
रब्बी पेरणी लायक पाऊस नसतानाही पिक निहाय लागणारे बियाणे व रासायनिक खतांचे नयोजन करण्यात आला असल्याचा निर्वाळा कृषी विभागाने दिला आहे.