रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षितच
By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:06:32+5:302014-07-16T01:26:39+5:30
जालना: रेल्वे स्थानकांवर संरक्षणासाठी अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़

रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षितच
जालना: रेल्वे स्थानकांवर संरक्षणासाठी अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ औरंगाबाद ते परभणी या महत्वाच्या रेल्वे मार्गावरील बहुतांश स्थानकांत सुरक्षा व्यवस्था तोकडी असल्याने येथे लूटमार तसेच रेल्वेवर दगडफेकीचे प्रकार वारंवार घडत आहेत.
जालना, रांजणी, पारडगाव, सातोना, परतूर, सेलू, मानवत या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर सातत्याने दगडफेक पाकीटमार, महिलांचे दागिने पळविणे आदी घटना खुलेआम घडतात. काही दिवसांपूर्वीच रेल्वेवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर प्रवासी, राजकीय नेते व प्रसारमाध्यमांतून सुरक्षेविषयी आवाज उठविण्यात आला़ प्रवाशांच्या सुरेक्षेची मागणी करताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्थानकात शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले़
एकूणच वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशी सतत असुरक्षित व भयभीत असतात़ अशा घटनानंतर स्थानिक पोलिसांची धावपळ होते़ रेल्वे पोलिस नंतर येऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात़ तोपर्यंत आरोपी पसार झालेले असतात़ या सततच्या घटनांमुळे व प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे रेल्वे प्रशासनाने चार शस्त्रधारी पोलिस स्थानकावर नियुक्त केले होते़ मात्र, शस्त्रधारी पोलिस हळूच चोरपावलाने काढून ‘काठीधारी’ दोन पोलिस आता स्थानकावर दिसत आहेत़ म्हणजे पुन्हा प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावऱ
रेल्वे स्थानकावर गुन्हेगारी करणारे चोर, दरोडेखोर हे स्थानिक म्हणजे जवळच्या गावातीलच असतात. गुन्हेगार गुन्हा करून पसार होतात़ गुन्ह्याचे ठिकाण हे रेल्वे पोलिसांच्या अख्त्यारित येते़ यामुळे रेल्वे पोलिसांना घटना कळेपर्यंत व ते येईपर्यंत गुन्हेगार पसार होतात़ हे आरोपी शोधतांना स्थानिक पोलिस व रेल्वे पोलिस यांच्यात बऱ्याचदा गोंधळ होतो़ यात गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे.