शिक्षकांच्या आपसी बदल्यांवर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: May 26, 2015 00:46 IST2015-05-26T00:09:24+5:302015-05-26T00:46:01+5:30

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेत कर्मचारी म्हणून सर्वाधिक संख्येने असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांनाही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जि.प. प्रशासनही गोंधळून गेले आहे

Question mark on mutual exchange of teachers | शिक्षकांच्या आपसी बदल्यांवर प्रश्नचिन्ह

शिक्षकांच्या आपसी बदल्यांवर प्रश्नचिन्ह



संजय कुलकर्णी , जालना
जिल्हा परिषदेत कर्मचारी म्हणून सर्वाधिक संख्येने असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांनाही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जि.प. प्रशासनही गोंधळून गेले आहे. त्यामुळे शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले असून सोमवारी सायंकाळपर्यंत ते मिळू शकले नव्हते.
मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांना स्थगिती दिलेली आहे. आपसी बदल्यांचा मार्ग जिल्हा परिषदांना मोकळा होता. परंतु प्रशासकीय व विनंती या दोन्ही प्रकारच्या बदल्या करता येणार नसल्याने आपसी बदल्या कराव्यात का, याबाबत जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा गेल्या चार-पाच दिवसांपासून विचाराधीन आहे. त्यातच शिक्षक संघटनांकडून आपसी बदल्या करण्याबाबत आग्रही मागणी होत असल्याने प्रशासकीय यंत्रणा कमालीची गोंधळून गेली.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचे मार्गदर्शन मागविण्यात आले. परंतु त्याबाबतही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दोन वेगवेगळ्या सूचना प्राप्त झाल्याने सोमवारी सायंकाळी जि.प. प्रशासनासमोर पुन्हा पेच निर्माण झाला. आज दिवसभर विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जिल्हा परिषदेत तळ ठोकून होते.
अध्यक्ष तुकाराम जाधव, शिक्षण सभापती ए.जे. बोराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांच्यात सातत्याने याबाबत चर्चा सुरू होती.
उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हेही भ्रमणध्वनीद्वारे पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे मार्गदर्शन घेण्यासाठी सुरूवातीला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यानंतर एसएमएसद्वारे संपर्क झाला. मात्र ठोस निर्णय मिळू शकला नाही.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख म्हणाले की, शिक्षकांच्या आपसी बदल्यांसंदर्भात मंत्रालयीन स्तरावरील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आपसी बदली प्रक्रियेसाठी सज्ज आहे, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
२०११-१२ मध्ये प्रशासकीय बदल्यांद्वारे गैरसोयीच्या ठिकाणी गेलेल्या शिक्षकांच्या आपसी बदल्या यंदाच्या सर्वसाधारण बदल्यांपूर्वी करण्यात याव्यात, असे आदेश शासनाने यापुर्वीच दिले होते. मात्र यावर्षीच्या बदल्यांचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने याही बदल्या अडचणीत सापडल्या. बदलीपात्र १३ शिक्षकांनी तर याबाबत निवेदनाद्वारे उपोषणाचा इशाराही दिला होता. शिक्षण सभापती ए.जे. बोराडे यांनी या शिक्षकांशी संपर्क साधून ३० मे पर्यंत त्यांच्या बदल्यांचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणाचा इशाराही मागे घेण्यात आल्याचे एम.आर. खतीब यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्या व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर आपण सतत पाठपुरावा करीत असल्याची माहिती शिक्षण सभापती ए.जे. बोराडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. वर्षातून एकदा ही बदली प्रक्रिया होते, त्यामुळे जे बदलीसाठी पात्र असतात, त्या शिक्षकांची अपेक्षा असते. त्यामुळे या बदल्या व्हाव्यात, यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करीत आहोत, असेही सभापती ए.जे. बोराडे म्हणाले.
शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार आपसी बदल्यांना कोणताही अडसर नाही. त्या झाल्याच पाहिजेत. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी याबाबत लक्ष देऊन आपसी बदल्या कराव्यात.
- बाबासाहेब जुंबड
(जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ)
यावर्षी ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे १८ मे २०१५ च्या शासन आदेशाप्रमाणे प्रशासकीय व एकतर्फी विनंती बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक संवर्गातील जवळपास २०० पेक्षा अधिक शिक्षकांनी आपसात बदलीसाठी विनंती अर्ज प्रशासनाकडे केलेला आहे. या सर्व बदल्या ३१ मे पूर्वी कराव्यात, अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे.

Web Title: Question mark on mutual exchange of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.