बाजार समितीच्या सभेवरच प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: January 12, 2016 23:43 IST2016-01-12T23:41:32+5:302016-01-12T23:43:54+5:30
हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२ जानेवारी रोजी झालेल्या सभेवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजार समितीच्या सभेवरच प्रश्नचिन्ह
हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२ जानेवारी रोजी झालेल्या सभेवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही सदस्यांनी या सभेत झालेल्या सर्व ठरावांना विरोध असल्याचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना दिले आहे.
हिंगोलीची बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल ११ संचालकांनी सभेतील ठरावांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ही सभा झाली की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सभेनंतर काही वेळांनीच संचालकांनी विरोध सुरू केला. यात ठराव लिहिण्यापूर्वीच काही संचालकांनी अनावधानाने सह्या केल्याने ते आम्हाला मान्य नाही. हे प्रोसिडिंग ग्राह्य धरू नये, असे पत्र सचिवांना राजेश पाटील, संजय कावरखे, रामचंद्र वैद्य, प्रशांत सोनी, शंकर पाटील, दत्तराव जाधव, शे.बुऱ्हाण, प्रभाकर शेळके, मीनाताई कावरखे, किसन लक्ष्मण नेव्हल, लिंबाजी मुटकुळे या संचालकांनी दिले आहे. त्यानंतर उपासभापती दत्तराव जाधव यांनी सचिवांकडे उपस्थितीपट व प्रोसिडिंग मागितली असता ती दिली नसल्याची तक्रार केली आहे. सचिव जब्बार पटेल यांनी तर सभापती रामेश्वर शिंदे हे प्रोसिडिंग, उपस्थितीपट व प्रवास भत्ता रजिस्टर घेवून गेले, सहायक निबंधकही मागणीसाठी आले असता ते त्यांच्याकडेच होते, असा जबाब दिला. तर तीननंतर ते माझ्याकडे आल्याचे पटेल यांनी सांगितले.
या सर्व प्रकारामुळे बाजार समितीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संचालकांचा नूर काही वेगळेच सांगून जात असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)