मराठा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस सरकारनेच मार्गी लावला - अशोकराव चव्हाण
By Admin | Updated: October 14, 2014 00:11 IST2014-10-13T23:37:50+5:302014-10-14T00:11:32+5:30
शरद वाघमारे, मालेगाव काँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला व यापुढेही करु,

मराठा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस सरकारनेच मार्गी लावला - अशोकराव चव्हाण
शरद वाघमारे, मालेगाव
काँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला आहे व यापुढेही करु, असे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत सांगितले़
खा़ चव्हाण म्हणाले, दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी हरित व सिंचनक्रांती करुन जिल्ह्याची पायभरणी केली आहे़ त्यांनी विकास कामाचा पाया रचला आता आपल्या साथीने कळस चढविण्याचे काम करायचे आहे़ त्यासाठी भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातून अमिता चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या़
या जिल्ह्याने लोकसभेमध्ये महाराष्ट्राची शान राखली आहे़ पक्षाने यापूर्वी ज्यांना मोठी पदे दिली तेच हव्यासापोटी दलबदलू झाले आहेत़ माझ्या पत्नीला मिळालेली उमेदवारी केवळ तुमच्या आग्रहावरुन दिलेली आहे, असेही ते म्हणाले़
जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, पिंटू स्वामी, सरपंच मंगला स्वामी आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन शंकर कंगारे यांनी केले़
भोकर: ग्रामीण भागातील समस्या मी जवळून पाहिल्या आहेत़ ज्या ठिकाणी गरज आहे़ तेथील विकास करीत हा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी नेहमीच बांधील आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
भोकर तालुक्यातील बटाळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ते बोलत होते़ ते म्हणाले, या मातीचे व आमचे जुने नाते आहे़ हे मी कदापि विसणार नाही़ येथे नंदनवन फुलवण्यासाठी सिंचनाची मोठ्या प्रमाणात कामे करु़ मी तुमचा खासदार म्हणून पाच वर्षे आहे़ माझ्या सोबतीला आमदार असला की, विकासाचा मार्ग सुकर होणार आहे़ यासाठी अमिता चव्हाण यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी अप्पाराव देशमुख सोमठाणकर, राजा खंडेराव देशमुख, जगदिश भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर, गोविंद गौड, सिद्धेश्वर पिटलेवाड, गंगाधर बटाळकर यांची उपस्थिती होती़ दरम्यान, अमिता चव्हाण यांनी आज दिवशीतांडा, पाकीतांडा, सावरगावतांडा, वागर, पांढरवाडी या ठिकाणी बैठका घेतल्या़
विकासाबाबत आपली भूमिका विशद करताना अमिता चव्हाण म्हणाल्या, मागील पाच वर्षांपूर्वी वाडी तांड्यावर रस्ते नव्हते; पण आता या रस्त्याचे मजबुतीकरण झाले आहे़ या भागाच्या विकासासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे़ विकासाला गती देण्याची गरज आहे़ यासाठी खा़ अशोकराव चव्हाण, मी व आपण सर्वांनी मिळून काम करु़ यावेळी मंगला निमकर, कैलास राठोड, राजू पाटील दिवशीकर, माधव राठोड, इराबाई राठोड, कैलास कदम, गंगाधर राठोड, राजू हनवते, गजानन ढगे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)