मुलांच्या ताब्यावरून न्यायालयाच्या आवारात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:00 IST2017-08-11T00:00:55+5:302017-08-11T00:00:55+5:30
मुलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला आणि न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली

मुलांच्या ताब्यावरून न्यायालयाच्या आवारात राडा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : न्यायालयाने नोटीस दिल्यानंतर मुलांचा ताबा घेण्यासाठी आई माहेराकडील नातेवाइकांसह न्यायालयात आली. वडीलही मुलांना घेऊन न्यायालयात पोहोचले. आईला मुलांचा रीतसर ताबाही मिळाला. मात्र, मुलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला आणि न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली. येथील न्यायालयाच्या आवारात गुुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वडी येथील प्रवीण बाबूराव कुºहाडे यांचा पत्नी कल्पना यांच्यासोबत कौटुंबिक वाद आहे. या दाम्पत्याची तिन्ही मुले रोहन (४), पूनम (३) व पायल (७ महिने) वडील प्रवीण हिवाळे यांच्याकडे राहत होती. मुलांचा ताबा आपणास देण्यात यावा यासाठी कल्पना यांनी परतूर न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने मुलांना आईच्या ताब्यात देण्याची नोटीस प्रवीण हिवाळे यांना दिली. त्यानुसार हिवाळे गुरुवारी नातेवाईकांसह तिन्ही मुलांना घेऊन परतूर न्यायालयात आले. मुलांना आईच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी मुलांच्या गळ्यातील सोन्याचा ‘ओम’, कानातील दागिने, चांदीचे वाळे गायब असल्याने कल्पना यांनी पतीकडे दागिन्याची मागणी केली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयाच्या आवारातच हाणामारी सुरू झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आले. वडीहून आलेला मुलांचा पिता व सोबतच्यांना पोलीस बंदोबस्तात गावी नेऊन सोडण्यात आले. चार वर्षाचा रोहन वडिलांकडे जायचे म्हणून रडत होता, तर त्याच्या दोन्ही बहिणी निरागसपणे घडत असलेला सर्व प्रकार पाहत होत्या. मुलांची आई कल्पना यांच्याकडून अॅड. झेड. एन. कादरी यांनी काम पाहिले.