पूस पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली
By Admin | Updated: September 4, 2014 01:26 IST2014-09-04T00:38:38+5:302014-09-04T01:26:22+5:30
घाटनांदूर : गौरी, गणपती अशा महत्वपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूस आणि उद्भवन केंद्र अंबलवाडीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने तोडला आहे

पूस पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली
घाटनांदूर : गौरी, गणपती अशा महत्वपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूस आणि उद्भवन केंद्र अंबलवाडीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने तोडला आहे. परिणामी सणासुदीच्या दिवसात योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तब्बल १९ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजारात वाढ होऊ लागली आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा पूस योजना आणि अंबलवाडी उद्भवन केंद्राचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकबाकीपोटी खंडित केला आहे. मे, जून व जुलै २०१४ या तीन महिन्यांचे एकूण चालू वीज बिल १२ लाख रुपये थकलेले आहे. वीज वितरण कंपनीने कुठलीही नोटीस न देता अचानक वीजपुरवठा खंडित करीत असल्याने प्रत्येकवेळी पाण्यासाठी भटकंती अटळ आहे. जिल्हा परिषदेंतर्गत असलेली पूस पाणीपुरवठा योजना सतत या ना त्या कारणाने बंदच असते. तुरटी, ब्लिचिंग पावडरचा तुटवडा तर दुरुस्ती साहित्याचा अभाव, कर्मचाऱ्यांची वाणवा यामुळे ही योजना सतत बंद असते. वीजपुरवठा सुरू असला तरी या ना त्या कारणाने ही योजना नेहमी बंद असते. सध्या सणासुदीचे दिवस असून, पाण्याची गरज भासते. अशा स्थितीत पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
अनेक गावांतून पूरक पाणीपुरवठा योजना असल्या तरीही एकाही गावाला पिण्यायोग्य शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र घाण पाणी, डबके, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावर चिखल दिसून येत आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून, साथरोग फैलावत आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने अडचण निर्माण झाली आहे. १२ लाख रुपये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने पूस पाणीपुरवठा योजना पुन्हा अडचणीत सापडली आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
याबाबत पूस योजनेचे शाखा अभियंता जी.बी. भुजबळ म्हणाले, योजनेवर अवलंबून असलेल्या गावाकडे तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. एकही ग्रा.पं. पैसे भरावयास तयार नाही. बील भरल्यास कनेक्शन जोडू. (वार्ताहर)
पूस योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तळणी, दत्तपूर, अंबलटेक, तेलघणा, हनुमंतवाडी, पूस, गिरवली आपेट, गिरवली बावणे, साकूड, मुलतानतांडा, वरवटी, अंबलवाडी या अंबाजोगाई तालुक्यातील १३ तर परळी तालुक्यातील नंदागौळ, लेंडेवाडी, लेंडेवाडीतांडा, आनंदवाडी, नागदरा या पाच अशा १९ गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे.