पुरुन उरणारे मुंडे
By Admin | Updated: June 4, 2014 01:28 IST2014-06-04T00:30:32+5:302014-06-04T01:28:54+5:30
बीड: राजकारणातील आरोप-प्रत्यारोपाचे वार सहन करीत मुंडे यांचा राजकीय प्रवास सर्वसामान्यांशी नाळ जोडणाराच राहिला.

पुरुन उरणारे मुंडे
बीड: राजकारणातील आरोप-प्रत्यारोपाचे वार सहन करीत मुंडे यांचा राजकीय प्रवास सर्वसामान्यांशी नाळ जोडणाराच राहिला. राजकारणात अगदी वैयक्तिक स्वरूपाचे आरोप झाले तरी ते कधी डगमगले नाहीत. आपल्यावरील वार परतवून लावण्याची राजकीय मुसद्देगिरी त्यांच्यात होती. कधी अगदी जिल्हा बँकेतील गैरप्रकाराला पाठीशी घातल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, तर एन्रॉन सारखा प्रकल्प समुद्रात बुडवून टाकण्याची भाषा करीत सत्तेत आल्यानंतर त्याला बगल देण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. १९७० च्या दरम्यान मराठवाड्याच्या राजकारणात सक्रिय सहभागी झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात अनेक चढउतार पाहिले. मुंडे सत्तेत असले काय अन् नसले काय सारखेच असायचे. १९९५ ते ९९ ही पाच वर्षे सोडता मुंडे कायम सत्तेच्या बाहेर राहिले. मात्र ते सतत चर्चेत राहिले आहेत. दरम्यानच्या काळात विरोधकांनी केलेल्या आरोपातून सहजपणे ते पक्षाला बाहेर काढायचे हा त्यांचा हातखंडा असायचा. रेल्वेसह मराठा आरक्षणासाठी मुंडे यांना विरोधकांनी लक्ष्य केले़ मात्र त्याला ही मुंडेंनी आपल्या खास शैलीत उत्तरे देत विरोधकांच्या घशात दात घालण्याचा प्रयत्न केला़ विरोधी गटातून होणार्या आरोपाला सहजरीत्या परतवून लावण्यात मुंडेचा हातखंडा होता़ ग्रामीण जीवनाशी त्यांची नाळ नेहमीच जोडलेली असायची. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण असायची. कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळायला ते कधीच विसरायचे नाहीत. त्यामुळेच जनता त्यांच्यावर जिवापाड प्रेम करायची. राज्यस्तरावरील राजकीय गुन्हेगारीचा पर्दाफाश असो की एन्रॉन प्रकल्प राज्याच्या हिताचा नाही हे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस गोपीनाथ मुंडे दाखवायचे. परपक्षीय स्तरावरची मैत्री जोपासण्यामध्ये गोपीनाथ मुंडे आग्रही असायचे. राजकारण म्हटले की आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी आल्याच. मात्र प्रचंड हजरजबाबीपणा व समयसूचकता गोपीनाथ मुंडे यांच्या ठायी असल्याने पक्षावरील गंभीर आरोप देखील ते परतवून लावत असत. त्यांच्या या खुबीमुळेच ते मास लिडर म्हणून परिचित होते. सत्तेबाहेर राहून देखील प्रशासनावर जबरदस्त पकड असायची. एखादा प्रश्न मांडताना विषयाचा असलेला अभ्यास त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी व्यक्त व्हायचा. त्यांच्या या गुणामुळेच सत्तेतली पाच वर्षे सोडली तरी ते कायम चर्चेत होते. यामुळेच संघर्षाचे दुसरे नाव गोपीनाथ मुंडे असे म्हणणे योग्य ठरेल. (प्रतिनिधी) संघर्षाचे दिवस संपल्यानंतर आता कुठे चांगले दिवस आले होते. मात्र अचानक काळाने घाला घातल्याने गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्टÑाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे आपल्यातून निघून गेलेत, यावर विश्वासच बसत नाही. बीड जिल्ह्याचे नेतृत्व हरवले आहे. -स्वरुपसिंह हजारी, माजी नगराध्यक्ष, धारुर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन निघणे अशक्य आहे. परपक्षात मैत्रीचे नाते जोपासणारे ते एक उत्कृष्ट राजकारणी होते. सतत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मुंडे उभे राहत. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपल्याने हळहळ वाटते. - राजेश देशमुख, विश्वस्त, वैद्यनाथ देवस्थान,परळी महाराष्टÑातील सच्चा कार्यकर्ता गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पोरका झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना त्यांनी कायम बळ दिले आहे. बीड जिल्ह्यातील देशपातळीवरील नेतृत्व हरपल्याने देशाचे व महाराष्टÑाचे मोठे नुकसान झाले आहे. साहेबांचे निधन झाले, यावर विश्वासच बसत नाही. -रमेश पोकळे, जिल्हाध्यक्ष, भाजपा, बीड गोपीनाथराव मुंडे यांनी गतवर्षी भगवानगडावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती़ आरक्षणाचा प्रश्न फक्त मुंडे यांनीच सोडवला असता़ मात्र, मुंडे यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आतोनात नुकसान झाले आहे़ - पुरुषोत्तम खेडेकर अध्यक्ष, मराठा सेवा संघ जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले़ त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्हा पोरका झाला आहे़ मराठा समाजाच्या हितासाठी मुंडे यांनी सतत सकारात्मक भूमिका घेतली़ असा कर्तृत्ववान नेता पुन्हा होणार नाही़ - प्रा़ अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने ओबीसीचा मुख्य चेहरा हरवला आहे. मुंडे यांनी तमाम ओबीसी वर्गांसाठी लढा केला. महायुतीत दलित पक्षांनाही सोबत घेतले, असे नेतृत्व जिल्ह्यात पुन्हा होणे नाही. त्यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. - अरुणा आठवले, कास्ट्राईब संघटनेच्या विभागीय अध्यक्षा, बीड