पूर्णा-टोकाईचा करार गोत्यात

By Admin | Updated: September 16, 2014 01:29 IST2014-09-16T00:51:05+5:302014-09-16T01:29:52+5:30

वसमत : तालुक्यातील पूर्णा साखर कारखान्याने नियोजित टोकाई साखर कारखाना भागिदारी तत्त्वावर चालविण्याचा करार केला होता.

Purna-Tokai's Agreement signed | पूर्णा-टोकाईचा करार गोत्यात

पूर्णा-टोकाईचा करार गोत्यात


वसमत : तालुक्यातील पूर्णा साखर कारखान्याने नियोजित टोकाई साखर कारखाना भागिदारी तत्त्वावर चालविण्याचा करार केला होता. मात्र या करारास अद्याप अधिकृत मान्यता न मिळाल्याने हा करार कागदावरच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे करारात ठरल्याप्रमाणे आॅक्टोबरमध्ये कारखाना सुरू होण्याची शक्यताही दुरावली आहे.
पूर्णा सहकारी साखर कारखाना व टोकाई सहकारी साखर कारखाना या दोघांत १३ जुलै २०१४ रोजी लिखित करार झाला होता. या करारात ‘पूर्णा’ ने टोकाई सुरू करायचा व चालवायचा असा, पाच वर्षांसाठीचा करार लिखित स्वरूपात केलेला आहे. आॅक्टोबर २०१४ पर्यंत टोकाई सुरू होणार असल्याचे करारात नमूद आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा करार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पूर्णा कारखान्याने हा करार झाल्यानंतर टोकाईस पूर्णाचे युनिट क्र.३ असे नावही दिले होते. वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्येही तसेच नमूद करण्यात आले होते. नियोजित टोकाईसाठी कर्मचारी घेण्यात येणार असल्याच्याही हालचाली सुरू झाल्या. परंतु या करारास विभागीय सहसंचालक (साखर) यांच्याकडून मान्यताच आलेली नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे हा करार प्रत्यक्षात येतो का नाही? हा प्रश्न उभा राहत आहे. भरीस भर म्हणून टोकाई कारखान्याचे कार्यकारी संचालक डाखोरे यांनी पूर्णा कारखान्याच्या कार्यकारी संचालकास २२ आॅगस्ट २०१४ रोजी लेखी पत्र दिले होते. यात टोकाईचे माहे जुलै महिन्याचे २८ हजार १४० रुपये वीज बिल भरण्यासाठी रक्कम देण्याची मागणी केली होती. या पत्रावर पूर्णाचे जनरल मॅनेजर यांनी शेरा लिहिला की, ‘विभागीय सहसंचालक (साखर) यांच्याकडून आलेल्या सूचनेप्रमाणे भागिदारी करारास मान्यता मिळेपर्यंत आपल्या कारखान्यासाठी कोणताही खर्च करणे शक्य नाही’ या शेऱ्यामुळे आता करारास मान्यता मिळेपर्यंत ‘टोकाई’ वर ‘पूर्णा’ खर्च करणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे टोकाई कारखान्याकडूनही आॅक्टोबरपर्यंत कारखाना सुरू न झाल्यास करार रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली जात आहे. पूर्णाकडून कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर देणी देण्याचीही व्यवस्था झाली नसल्याचे एका संचालकाने सांगून हा करार अल्पजिवी ठरणार असल्याचे सूचक वक्त व्य केले आहे.
विशेष बाब अशी की, टोकाई कारखान्याच्या मशीनरी खरेदीसाठी पूर्णा कारखान्याने १ कोटी ५ लाख रुपये एन.एस.सी. कंपनीस अदा केले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Purna-Tokai's Agreement signed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.