पूर्णा नदी कोरडीठाक
By Admin | Updated: August 20, 2014 00:20 IST2014-08-19T23:39:21+5:302014-08-20T00:20:57+5:30
येलदरी : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी जिंतूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही़ त्यामुळे येलदरी धरणावरील पूर्णा नदी अक्षरश: कोरडीठाक पडली आहे़

पूर्णा नदी कोरडीठाक
येलदरी : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी जिंतूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही़ त्यामुळे येलदरी धरणावरील पूर्णा नदी अक्षरश: कोरडीठाक पडली आहे़ त्यामुळे या परिसरातील खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़
यंदा खरीप हंगामात पावसाअभावी पिके हातची गेली़ तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ यामुळे शेतकरी चारही बाजुंनी आर्थिक व नैसर्गिक संकटात सापडला आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपले जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे़ परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ भर पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्यामुळे सोयाबीन, कापूस व तूर ही पिके सुकू लागली आहेत़
आणखी आठ-दहा दिवस पाऊस न पडल्यास येलदरी व परिसरातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता आहे़ बळीराजा सध्या आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ गेल्या आठवड्यात या परिसरातील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती़
दुष्काळी परिस्थिती राहिल्यास या परिसरातील शेतकरी व मजुरांना कामासाठी इतर जिल्ह्यामध्ये स्थालंतर करण्याची वेळ येऊ शकते़ काही मजुरांनी इतर जिल्ह्यामध्ये कामाच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे़ (वार्ताहर)