अरुण घोडे, औरंगाबादव्हायोलिन अकादमी, पुणे आणि प्रोझोन व्हेरॉक आदी सहप्रायोजकांच्या स्वरझंकार संगीत उत्सवाची सुरुवात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. आनंद भाटे यांच्या ‘सुमिरो तेरो नाम’ या बडा ख्यालाने झाली. ‘पायलिया झंकारे’ या चिजेने रसिकांच्या मनाची पकड घेतली. सायंकालीन रागाच्या सादरीकरणात किराणा घराण्याची परंपरा जपत आपले आनंद रंग उधळीत मिश्रकाफी रागातील ठुमरीने रंगत आणली. ‘वद जाऊ कुणाला शरण’ या नाट्यगीतातील तानांची कशिदाकारी सुश्राव्य होती.‘माझे माहेर पंढरी’ या पं. भीमसेन जोशींच्या गाजलेल्या अभंगाने पूर्वार्धाची सांगता झाली. प्रशांत पांडव (तबला) तन्मय (संवादिनी) आदित्य देशपांडे, प्रथमेश यांनी तानपुऱ्यावर मधुर साथ केली. कलासागरचे राहुल मिश्रीकोटकर, किरण वाडी, मनीष धूत आदींनी पं. आनंद भाटे यांचा सत्कार केला. उस्ताद शाहीद परवेज (सितार) व पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) यांच्या जुगलबंदीने उत्तरार्धाची सुरुवात झाली.राग रागेश्रीतील जुगलबंदीने दीड-दोन तास रसिकांना बांधून ठेवले. प्रारंभीच्या स्वरविस्तारात उस्ताद शाहीद परवेज यांनी आपल्या ‘मिंड’ कामातील चमत्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर पं. मुकेश जाधव यांनी समर्थ साथकेली.राग-रागेश्रीच्या सादरीकरणानंतर मिश्र रागातील लोकधून वाजवून रसिकांना ठेका धरायला लावला. दोन्ही वाद्यांच्या आपापल्या मर्यादा असूनही दोन दिग्गजांनी त्या सीमारेषा ओलांडून वादनकौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पुरिया धनाश्रीने स्वरझंकार संगीत उत्सवाची जोरदार सुरुवात
By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST