कुत्र्यांची टोळी बनली ‘वासरांचा’ कर्दनकाळ !

By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:34:50+5:302014-07-01T01:03:30+5:30

शिरूर अनंतपाळ : मोकाट कुत्र्यांच्या टोळीने शिरूर अनंतपाळच्या शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडविली

Puppies became a 'calf'! | कुत्र्यांची टोळी बनली ‘वासरांचा’ कर्दनकाळ !

कुत्र्यांची टोळी बनली ‘वासरांचा’ कर्दनकाळ !

शिरूर अनंतपाळ : मोकाट कुत्र्यांच्या टोळीने शिरूर अनंतपाळच्या शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडविली असून, महिनाभरात डझनभर वासरांचा फडशा तर अनेक गायी-म्हशींच्या कोवळ्या वासरांचे लचके तोडून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे समस्त शेतकरी त्रस्त झाल्याने कुत्र्यांची टोळी बनली वासरांचा ‘कर्दनकाळ’, अशी आर्त हाक देत आहेत. परंतु, शेतकऱ्यांची ही आर्त हाक ऐकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिरूर अनंतपाळ येथे शेतीस पूरक म्हणून अनेक शेतकरी दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे अनेकांच्या शेतात गोठे असून, गोठ्यात गायी-म्हशींच्या कोवळ्या वासरांची संख्या सुद्धा भरपूर आहे. परंतु, या कोवळ्या वासरांना मोकाट कुत्र्यांच्या टोळीने सळो की पळो करून सोडले असून, दहा ते पंधरा कुत्रे अचानक येऊन गोठ्यात किंवा गोठ्या शेजारी बांधलेल्या वासरांवर अचानक हल्ला करून क्षणार्धात वासरांचा फडशा पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडाली असून, दुग्धोत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर जखमी वासरांवर औषधोपचाराचा मोठा खर्चही करावा लागत आहे. महिनाभरात या मोकाट कुत्र्यांच्या टोळीने डझनभरापेक्षा अधिक वासरांचा फडशा पाडला आहे. परिणामी, मोकाट कुत्र्यांची टोळी ‘वासरांचा’ कर्दनकाळ बनली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या टोळीची समस्या दूर व्हावी आणि दुग्धोत्पादनास अडथळा होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके, मनपा गटनेते मकरंद सावे यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले. (वार्ताहर)
सोडलेली टोळी...
दरम्यान, शिरूर अनंतपाळ शिवारात लातूर येथून कुत्र्यांची टोळी वाहनाद्वारे आणून सोडण्यात आली असल्याचेही शेतकरी लाला मुजेवार यांनी सांगितले.
या शेतकऱ्यांना झळ...
मोकाट कुत्र्यांच्या टोळीची झळ एक-दोन नव्हे, तर डझनभर शेतकऱ्यांना बसली असून, यामध्ये लाला मुजेवार, विश्वनाथ उंबरगे, शरद देवंगरे, लिंगेश्वर तोंडारे, वीरभद्र मनगुरे, त्र्यंबक सांगवे, शिवहार डोंगरे, बाळू घाडगे, विलास गजिले, बाबूराव संभाळे, तानाजी फुलारी, बालाजी पारशेट्टे आदी शेतकऱ्यांच्या पशुंना फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Puppies became a 'calf'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.