शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब !
By Admin | Updated: August 31, 2014 01:08 IST2014-08-31T00:41:21+5:302014-08-31T01:08:28+5:30
जालना : शहरात नगरपालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब झाली असून बोटावर मोजता येतील इतकी स्वच्छतागृहे कशीबशी सुरू आहेत. मात्र त्यापैकीही काही बंद आहेत

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब !
जालना : शहरात नगरपालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब झाली असून बोटावर मोजता येतील इतकी स्वच्छतागृहे कशीबशी सुरू आहेत. मात्र त्यापैकीही काही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी अडचण होत आहे. मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाखांपर्यंत गेली आहे. व्यापारी पेठ म्हणून शहराची ओळख दूरवर आहे. मात्र सार्वजनिक स्वच्छतालयांची सुविधा या शहरात पाहिजे तशी नाही. सिंधी बाजार, अलंकार, शिवाजीपुतळा, पाणीवेस, शनिमंदिर, रेल्वेस्टेशन चौक इत्यादी भागातील स्वच्छतालये गायब झाली आहेत. गांधीचमन भागातील स्वच्छतागृह कसेबसे सुरू आहे. नूतन वसाहत पोलिस चौकीसमोर, काद्राबाद, जवाहर बाग, काद्राबाद या भागातील स्वच्छतागृहांची पडझड झालेली आहे. मस्तगड परिसरातील स्वच्छतागृह बंद आहे. तर अन्य ठिकाणी स्वच्छतागृहेच नाहीत.
नगरपालिकेच्या सभांमधून स्वच्छतागृहांबाबत अनेकदा चर्चा झाली. पालिकेने अनेकदा नवीन स्वच्छतागृहांची उभारणी करण्याची घोषणा केली. मात्र आतापर्यंत ही केवळ चर्चाच राहिली. प्रत्यक्षात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी अडचण होत आहे. शहरात इतर सुविधांच्या बाबतीत पालिकेने लक्ष घातले. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या बाबतीतही लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.