कीर्तनाद्वारे लोकप्रबोधन
By Admin | Updated: July 9, 2014 00:08 IST2014-07-08T23:32:59+5:302014-07-09T00:08:35+5:30
विलास चव्हाण, परभणी संत तुकाराम महाराज यांनी संसार करून परमार्थ साधून किर्तनाद्वारे लोकप्रबोधन केले होते़

कीर्तनाद्वारे लोकप्रबोधन
विलास चव्हाण, परभणी
संत तुकाराम महाराज यांनी संसार करून परमार्थ साधून किर्तनाद्वारे लोकप्रबोधन केले होते़ त्याचप्रमाणे गुरुवर्य ह़ भ़ प़ नथूराम महाराज केहाळकर यांनी परमार्थ साधून किर्तनाद्वारे अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा तसेच व्यसनापासून लोकांनी दूर राहण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले़
जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे एका शेतकरी कुंटुंबात ह़ भ़ प़ नथूराम महाराज केहाळकर यांचा जन्म झाला होता़ जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा व रुढी परंपरेचा पगडा मोठा होता़ त्यामुळे या लोकांमध्ये एक प्रकारे नैराश्य आल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला होता़ त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते़ ह़ भ़ प़ नथूराम महाराज केहाळकर यांनी आपल्या किर्तनातून जनजागृतीमुळे अनेकांनी गळ्यात माळा घातल्याने संसार उध्वस्त होता होता वाचले़ ह़ भ़ प़ नथूराम महाराज किर्तनासाठी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नव्हते़ तसेच किर्तनसाठी प्रवास खर्च, मानधन किंवा वाहनाची व्यवस्था अशी कसलीही अट त्यांनी कधीच घातली नाही़
ह़भ़प़ नथूराम महाराज केहाळकर यांचे कीर्तन ऐकण्यायाठी गावासह पंचक्रोषीतील लोक मोठ्या भक्तीभावाने येत होते़ त्यांचे कीर्तन हे साध्या, सोप्या भाषेत व समजेल असे असल्याने लोकांना ते आपले महाराज वाटू लागायाचे़ गोरगरीबांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडविण्यासाठी स्वत: पुढाकार घेत होते़ ह़भ़प़ नथूराम महाराज केहाळकर यांनी आषाढी कार्तिकी वारीला पायी दिंडी नेण्याचा प्रघात सुरू केला़ या दिंडीमध्ये असंख्य वारकरी सहभागी होत होते़ तसेच नाथषष्ठीला नाथांच्या पैठणला आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीला दिंडी नेण्याची प्रथा सुरू केली होती़ ५० वर्षांपासून वाऱ्या अव्याहतपणे सुरू आहेत़ वारकरी सांप्रदायातील थोर प्रवर्तक या दृष्टीकोनातून गुरुवर्य ह़भ़प़ नथूराम महाराज केहाळकर यांचे वारकरी संप्रादायात मानाचे स्थान आहे़ त्यांचे अनुयायी मराठवाड्यासह विदर्भात मोठ्या संख्येने आहेत़