महावितरणकडून जनजागृती गरजेची !
By Admin | Updated: April 15, 2016 01:45 IST2016-04-15T01:35:08+5:302016-04-15T01:45:21+5:30
जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र

महावितरणकडून जनजागृती गरजेची !
जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले. महावितरणकडून जनजागृती होत नसल्याचे ५० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे.
महावितरणकडून वीज वापराबाबत जागृती होते का? या विषयावर लोकमतने प्रश्नांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यावर नागरिकांने आपले मत व्यक्त करून महावितरणने जनजागृती व्यापक करावी, वाचकांनी नमूद केले. महावितरणकडून वीज वापराबाबत जनजागृती होते का? या प्रश्नावर ३० टक्के नागरिक होय म्हणतात. ५० टक्के नागरिक जनजागृती होत नसल्याचे सांगतात तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच म्हणायचे नाही. जागृती नसल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढले का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक चोरी वाढल्याचे सांगतात. ३० टक्के नागरिकांना चोरी होत नसल्याचे वाटते तर १० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. महावितरण कंपनीने जनजागृती केल्यास वीज चोरी कमी होईल का? याबाबत ७५ टक्के होय म्हणतात. १० टक्के म्हणतात वीज चोरी कमी होणार नाही. १५ टक्के नागरिकांना काहीच माहीत नाही. जागृती झाल्यास ग्राहक विजेचा योग्य वापर करतील का? ८० टक्के होय म्हणतात. १० टक्के नाही म्हणतात तर १० टक्के नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज जागृतीसोबतच वीज बिलांबाबतही जनजागृती केल्यास मनातील संभ्रम दूर होईल, असे वाचकांनी सांगितले. जागृतीसोबतच महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी टीका केली. या सर्व्हेक्षणातील प्रश्नांव्यतिरिक्तही नागरिकांनी विविध प्रश्नावंर आपले मनोगत व्यक्त करून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर लावला. महावितरण वीजचोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून काही भागात वीज चोरीला सुट देत असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. महावितरण कंपनीने सर्वच वीजचोरांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी काहींनी केली.