पीएसपीएसचा सूत्रधार अटकेत
By Admin | Updated: July 23, 2014 00:26 IST2014-07-22T23:55:46+5:302014-07-23T00:26:11+5:30
परभणी: पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड अॅण्ड सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक केल्यास तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविणाऱ्या सूत्रधारासह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे.

पीएसपीएसचा सूत्रधार अटकेत
परभणी: पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड अॅण्ड सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक केल्यास तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविणाऱ्या सूत्रधारासह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या सूत्रधाराकडून फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील कृष्णा ज्ञानोबा होगे यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड अॅण्ड सर्व्हिसेस कंपनीचा संचालक रवींंद्रकुमार डांगे, सतीश मोगल, पंडित चव्हाण, अशोक गायकवाड, कंदी, राठोड, कवी राऊत व त्यांचे वडील सुभाष राऊत यांनी संगनमत करुन कृष्णा याला कंपनीत ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. तसेच त्यासोबत इतर लोकांनाही गुंतवणूक केली. मात्र मुदत संपल्यानंतरही तीनपट रक्कम दिली नाही. कंपनीच्या संचालकाकडे वारंवार तगादा लावूनही पैसे परत मिळत नसल्याने नागरजवळा येथील कृष्णा होगे यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याकडे तपास देण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचा मुख्य सूत्रधार रवींद्रकुमार भागोराव डांगे व अशोक प्रभाकर गायकवाड फरार झाले होते. या आरोपींना पकडण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये संजय वळसे, माधव लोकुलवार, लक्ष्मण उपलेंचवार, शिवाजी धुळगुंडे, मोईन फारोखी, बालाजी रेड्डी यांचा समावेश होता. या पथकाने वरील दोन आरोपींना रत्नागिरी जिल्ह्यात २२ जुलै रोजी अटक केली. तपासामध्ये आतापर्यंत ५१ गुंतवणूकदार समोर आले असून ४१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसांनी रोख १२ लाख रुपये जप्त केले. तपास अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर तपास करीत आहेत. या आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.(प्रतिनिधी)
सहा आरोपींना अटक
फसवणूक प्रकरणी आरोपी रविकुमार मुरलीधर राठोड, आनंद उत्तमराव वाघमारे, प्रकाश नामदेव राठोड, पंडित गोपीनाथ चव्हाण, राजेश लक्ष्मण घनघाव, सतीश वैजनाथ थोरात या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२८ कोटींची उलाढाल
पीएसपीएस इंडिया कंपनीचा मुख्य सूत्रधार रवींंद्रकुमार डांगे याच्या बँक खात्यावरुन सुमारे २८ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. डांगे याची बँक खाती परभणी, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, पुणे येथे आहेत. या बँकखात्यावरुन तो पीएसपीएस इंडिया कंपनीचा व्यवहार करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.