पीआरपीने काँग्रेसकडे दिली २४ जागांची यादी
By Admin | Updated: August 20, 2014 23:55 IST2014-08-20T23:44:11+5:302014-08-20T23:55:30+5:30
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीआरपीने काँग्रेसकडे दिली २४ जागांची यादी
परभणी : पीपल्स रिपब्लिकन पार्टीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य केले. विधानसभेलाही काँग्रेससोबत मैत्री असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर चालला. परंतु, या निवडणुकीत हा प्रभाव राहणार नाही, असे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी पीआरपीने २४ जागांची यादी काँग्रेसवरिष्ठांकडे पाठविली आहे. राज्यात पीआरपीची काँग्रेस आघाडीसोबत युती आहे. काँग्रेस बरोबरच पीआरपीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणार आहे. त्यामुळे त्यांनीही जागा सोडाव्यात, असा आग्रह आम्ही धरल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची अजूनही पुर्तता झालेली नाही. महागाई वाढली आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असून पूर्वीचेच सरकार बरे होते, अशी भावना जनतेची बनत चालली असल्याचे कवाडे म्हणाले.
सध्या मोदी यांचाच रिमोट कंट्रोल असून देशाची लोकशाही हुकूमशाही होण्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचाही निषेध करत त्यांचे वक्तव्य देशहिताचे नाही. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ते शोभणारे नाही, असे ते म्हणाले. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु, भारत हा शब्द राष्ट्रवाचक असून हिंदू हा शब्द धर्मवाचक आहे. त्यामुळे या विधानातून देशाला विघटनाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न होत असून असे वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महामंत्री चरणदास मोरे, महाराष्ट्र सचिव गौतम मुंडे, जिल्हाध्यक्ष डी.एस.लहाने, अरुण लोखंडे, कैलास हिरवाळे, संगिताताई मुळे, विलास बनसोडे, बापुसाहेब गजभारे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)