एका महिन्यासाठी ५० कोटींची तरतूद
By Admin | Updated: April 27, 2016 00:24 IST2016-04-26T23:38:04+5:302016-04-27T00:24:23+5:30
बीड : जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ४३ कोटी २ लाख ४४ हजार रुपये छावण्यांवर खर्च झाला असून,

एका महिन्यासाठी ५० कोटींची तरतूद
बीड : जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ४३ कोटी २ लाख ४४ हजार रुपये छावण्यांवर खर्च झाला असून, पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी ५० कोटी रुपयांची तरतूद शासनाला करावी लागणार असून, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव बनविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील चारा टंचाई लक्षात घेऊन आवश्यक तेथे छावणी हे धोरण राज्य शासनाने अवलंबले व जिल्ह्यात एकूण २७४ छावण्यांना सढळ हाताने मंजुरी दिली. यापैकी आजघडीला प्रत्यक्षात २७० छावण्या सुरू आहेत. २ लाख ७९ हजार ३९७ मोठी, तर २१ हजार १६१ लहान जनावरे या छावण्यांच्या आश्रयाला आहेत.
२६ एप्रिलपर्यंत ४३ कोटी २ लाख ४४ हजार रुपये जनावरांच्या चारा-पाण्यावर खर्च झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.
आताच जिल्ह्यात जनावरांसाठी ओला चारा मिळत नाही. बहुतांश छावण्यांना जिल्ह्याबाहेरून चारा येत आहे. चारा वाहून आणण्याचे अंतर २०० पेक्षा अधिक किलोमीटर आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला नाही तर हेच अंतर ५०० कि.मी.पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
७ जून रोजी जरी पावसाने सुरुवात केली तरी पुढे १५ दिवस चारा उगवण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पाऊस पडताच छावण्या बंद करता येणार नाहीत. यामुळे आगामी काळात चारा-पाण्यासाठी ५० कोटींवर तरतूद करावी लागणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे.
याचाच एक भाग म्हणून ५० कोटी रुपयांच्या मागणीचा अहवाल तयार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)