खोडेगावला डीएमआयसीच्या पाणी शुद्धिकरण केंद्रातून पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST2021-02-26T04:05:42+5:302021-02-26T04:05:42+5:30
--- औरंगाबाद : खोडेगाव (ता. औरंगाबाद) या साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावाला पावणेदोन लाख लिटर पाण्याची गरज आहे. या गावात ...

खोडेगावला डीएमआयसीच्या पाणी शुद्धिकरण केंद्रातून पाणी द्या
---
औरंगाबाद : खोडेगाव (ता. औरंगाबाद) या साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावाला पावणेदोन लाख लिटर पाण्याची गरज आहे. या गावात डीएमआयसीचे पाणी शुद्धिकरण केंद्र आहे. त्यातून पिण्याचे पाणी मिळावे, अन्यथा गुरुवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता. ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी चिकलठाणा पोलिसांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची भेट घेतली.
ग्रामपंचायत सदस्य अमोल ढगे म्हणाले, खोडेगावला २०१३ ला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र, आजही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकदा मागणी करूनही पाण्याची व्यवस्था न झाल्याने गावकऱ्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी पाणी मिळावे अशी मागणी होती. गुरुवारी हंडा मोर्चा जिल्हा परिषदेवर आणणार होतो. महिला गावात जमल्या आहेत. मात्र, माझ्यासह अमोल सुधाकर ढगे, भगवान ढगे, दादाराव सरोशे, कारभारी वीर, विष्णू वीर, एकनाथ सरोशे यांना चिकलठाणा पोलिसांनी मोर्चा न काढता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीला घेऊन आले. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सोमवारपर्यंत पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनेसंबंधी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. सोमवारपर्यंत पाणीपुरवठ्यावर निर्णय न झाल्यास गावकरी अन्नत्याग आंदोलन करून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.