मराठी शाळांना पायाभूत सुविधा द्या

By Admin | Updated: November 29, 2014 00:28 IST2014-11-29T00:26:53+5:302014-11-29T00:28:52+5:30

उस्मानाबाद : मराठी शाळात शिकलेले अनेकजण आज विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातही पुढे आहेत. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुले उच्च शिक्षणातही अग्रेसर राहु शकतात

Provide infrastructure to Marathi schools | मराठी शाळांना पायाभूत सुविधा द्या

मराठी शाळांना पायाभूत सुविधा द्या


उस्मानाबाद : मराठी शाळात शिकलेले अनेकजण आज विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातही पुढे आहेत. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुले उच्च शिक्षणातही अग्रेसर राहु शकतात. मात्र त्यासाठी मराठी शाळांना पुरेशा पायाभूत सुविधा देवून त्यांची गुणवत्ता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शहरातील तब्बल ६८ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करा, मुलांना मातृभाषेतच स्वप्न पडायला हवीत, असे रोखठोक मत व्यक्त करुन एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे मत जाणून घेतले असता, आजच्या युगात इंग्रजी शिक्षण आवश्यकच आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची गरज नाही. मात्र मराठी शाळांचा सर्वांगिण दर्जा सुधारण्याची गरज व्यक्त केली. मराठी शाळांमध्ये राज्य शासनाने पुरेशा पायाभुत सुविधा निर्माण करुन दिल्यास तसेच एकूणच शिक्षणाचा दर्जा सुधारल्यास इंग्रजीकडे वळणारा पालक पुन्हा मराठी शाळांकडे वळेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद कराव्यात, या भालचंद्र नेमाडे यांच्या मताशी आपण सहमत आहात का’? असा प्रश्न ‘लोकमत’ने विचारला होता. यावर ७७ टक्के नागरिकांनी सहमत नसल्याने नमूद केले आहे. २१ टक्के नागरिक इंग्रजी शाळा बंद कराव्यात या मताचे आहेत. तर २ टक्के नागरिकांनी याबाबत सांगता येत नसल्याचे म्हटले आहे. इंग्रजी शाळा बंद कराव्यात असे बहुसंख्य नागरिकांना वाटत नसले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मातृभाषेवर विपरित परिणाम होत असल्याचे ६४ टक्के नागरिकांचे मत आहे. २७ टक्के नागरिकांनी इंग्रजी शाळांचा मातृभाषेवर कसलाही परिणाम होत नसल्याचे म्हटले असून, ९ टक्के नागरिकांनी सांगता येत नसल्याचे नमूद केले आहे.
एकूणच इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद कराव्यात या नेमाडे यांच्या मताशी बहुसंख्य पालक सहमत नाहीत. मात्र त्याचवेळी मराठी शाळांकडे शासनाने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. या शाळांना पुरेशा पायाभूत सुविधा, तज्ज्ञ शिक्षण मंडळी देवून शाळांची गुणवत्ता वाढवावी, असे बहुसंख्य नागरिकांचे मत असल्याचे या सर्वेक्षणावरुन स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नेमाडे यांनी मातृभाषेच्या दुरवस्थेचा मुद्दा या माध्यमातून उपस्थित केला आहे. याकडे भाषिक वाद म्हणून पाहू नये. मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृती टिकली पाहिजे, एवढेच नेमाडे यांचे म्हणणे आहे ते समजून घ्यायला हवे. इंग्रजीकडे जगाची भाषा म्हणून पाहिले जाते. तशी ती नौकरीची, रोजगाराची भाषाही झाली आहे. मात्र इंग्रजीकडे केवळ भाषा म्हणूनच पाहिले पाहिजे. मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृति टिकली पाहिजे, मराठी भाषिक शाळांकडे दुर्लक्ष होवू नये एवढेच नेमाडे यांचे म्हणणे आहे.
- भास्कर चंदनशिव, ज्येष्ठ साहित्यिक
इंग्रजी शाळा बंद करा हे नेमाडे यांचे विधान टोकाचे वाटत असले तरी त्याला मोठा संदर्भ आहे. फ्रान्स, जर्मनीसह इतर देशात मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. मग आपण इंग्रजीचा अट्टाहास कशासाठी धरतो आहोत. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी तो अधिक सहजपणे चांगल्या पद्धतीने आत्मसात करु शकतो. अनेक देशात इंग्रजी भाषा प्रमुख आहे. ते सर्वच देश प्रगत आहेत असे नव्हे. त्यामुळे मातृभाषेकडे, मराठीकडे शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शेवटी भाषेपेक्षा मुलांच्या कन्सेप्ट क्लियर होणे महत्वाचे आहे. आणि हे मातृभाषेतून अधिक प्रभावीपणे होवू शकते.
- प्रा. डॉ. संजय कांबळे, कळंब
भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत केलेले विधान महाराष्ट्रात मराठी तसेच मातृभाषेला अधिक चांगले दिवस मिळवून देण्यासाठीच केले आहे. भाषा म्हणून इंग्रजी आली पाहिजे. याबाबत दुमत नाही. परंतु संस्कृती म्हणून इंग्रजीकडे पाहू नये. इंग्रजी हे ज्ञान नाही तर ती इतर भाषेप्रमाणेच एक भाषा आहे. कोणतेही शिक्षण विद्यार्थ्याला मातृभाषेतून मिळाल्यास तो लवकर ते आत्मसात करतो. मराठीतून वाक्य समजून घेवून ते इंग्रजीत बोलावे लागत असल्याने मातृभाषेच्या तुलनेत इंग्रजी शिकण्यास उर्जाही जास्त खर्ची पडते.
- प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, उमरगा

Web Title: Provide infrastructure to Marathi schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.