छत्रपती संभाजीनगर : सोमवारी शहरात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेल्या बंदोबस्ताचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाखाली मंत्र्यांची बडदास्त ठेवत चौक, उड्डाणपूल बंद केले. एकीकडे जलवाहिनीच्या कामांमुळे रस्ते अरुंद झालेले असताना कार्यालयातून घराकडे निघाल्यानंतर तासनतास वाहतूक कोंडी अडकावे लागल्याने शहरवासीयांनी व्हीआयपी प्रोटाेकॉलवर संताप व्यक्त केला.
अनेक दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी रस्ते दुरुस्ती, जलवाहिनीच्या कामामुळे रस्ते खोदून ठेवण्यात आले. परिणामी, रस्ते अरुंद होऊन शहराचा वेग मंदावला आहे. सोमवारी दुपारपासून जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडको बसस्थानक ते सेव्हन हिल्स, अमरप्रीत चौक या भागात वाहनांची कोंडी झाली. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका तासनतास अडकल्या. सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण जालना रोड बंद केला होता.
व्हीआयपींच्या मूव्हमेंटसाठी शहर वेठीस का धरले?-सायंकाळी ४:३० वाजेपासूनच हायकोर्ट सिग्नल चौकाकडून रामगिरीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. परिणामी, एन-३ तसेच हायकोर्टमधून बाहेर पडणाऱ्यांना सेव्हन हिलवरून वळण घेऊन सिडकोच्या दिशेने जावे लागले.-हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. त्यात अनेक नेते, पदाधिकाऱ्यांची वाहने जालना रोडवरच उभी करण्यात आली. त्यामुळे या भागात वाहने रात्री ९ वाजेपर्यंत खोळंबली होती.-७ वाजेच्या सुमारास शिंदे ताफ्यासह एकनाथ रंगमंदिराच्या दिशेने निघाले. तेव्हा पुन्हा जालना रोड बंद करण्यात आला. त्या दरम्यान मोंढा नाका उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू बंद करण्यात आल्या. त्यातच पुलाखाली जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण रोडवर कोंडी झाली.-शिंदे नाट्यमंदिरात पोहोचल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने संपूर्ण उस्मानपुरा परिसरात वाहने खोळंबली.
नागरिकांना मनस्तापउपमुख्यमंत्री शिंदे बारा आमदार, तीन मंत्री, आठ जिल्हाप्रमुख व जवळपास ५० पेक्षा अधिक तालुकाप्रमुखांसह सोमवारी शहरात होते. यासाठी जवळपास १ हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. हायकोर्ट परिसर, सिडको बसस्थानक चौक, सेव्हन हिल, मोंढा उड्डाणपूल परिसरात यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
महिला वकिलासोबत पोलिसांचे गैरवर्तनएकीकडे मंत्र्यांच्या बंदोबस्तामुळे शहरवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागला. दुसरीकडे त्याच दरम्यान रस्त्यावर कार बंद पडलेल्या महिला वकिलासोबत पोलिसांनी गैरवर्तन करत अरेरावी केली. ॲड. निकिता गोरे औरंगाबाद खंडपीठात केंद्र सरकारच्या वकील म्हणून कार्यरत आहेत. सायंकाळी त्यांची हाॅटेल रामा इंटरनॅशनलजवळ कार बंद पडली. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे येणार असल्याने पोलिसांनी बहुतांश चौक, उड्डाणपूल बंद केले. व्हीआयपी बंदोबस्तात कार बंद पडल्याने पोलिसांनी त्यांच्यावरच अरेरावी केली. गोरे यांनी त्यांना वागणुकीबाबत जाब विचारल्यावर त्यांच्यावरच उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. कारवर काठ्या देखील मारल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्या पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठाण मांडून होत्या.