विद्यार्थ्यांची पुन्हा आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:00 IST2017-07-29T01:00:58+5:302017-07-29T01:00:58+5:30
निकालातील त्रुटी, कॅरिआॅन आणि कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्यामुळेही शुक्रवारी विद्यापीठात आंदोलन झाले.

विद्यार्थ्यांची पुन्हा आंदोलने
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या ‘पेट-४’ परीक्षेच्या निकालामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जाहीर केलेल्या निकालातील नकारात्मक गुणांकन रद्द करून पुन्हा पारदर्शक निकाल जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेऊन केली. याशिवाय निकालातील त्रुटी, कॅरिआॅन आणि कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्यामुळेही शुक्रवारी विद्यापीठात आंदोलन झाले.
ऐनवेळी नकारात्मक गुणांकन पद्धत लागू केल्यामुळे पेट-४ परीक्षेत केवळ ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आॅनलाइन परीक्षासुद्धा ‘वुई शाईन’ या कंपनीला फायदा देण्यासाठीच घेण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांनी केले. या निवेदनावर १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
विद्यापीठाने अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्या केल्यामुळे अनेक विभागात नवीन कर्मचारी आले आहेत. त्या कर्मचाºयांना विद्यार्थ्यांची कामे करण्याचा अनुभव नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे वित्त व लेखा विभाग, परीक्षा विभाग, शैक्षणिक, पीएच.डी., विविध विभागांमध्ये कामे खोळंबलेली आहेत. याशिवाय टीसी, मायग्रेशन, मार्क शीट, डुप्लिकेट मार्क शीट आणि पुनर्मूल्यांकनाची कामे खोळंबली असून, सर्व बदल्या रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल दांडगे यांनी केली आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फेही कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. पेट परीक्षा लवकर घेण्यात यावी, पदव्युत्तरची पुन्हा सीईटी घ्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे, आशिष इंगळे, पवन साळवे, सिद्धार्थ मोरे आदींच्या स्वाक्षºया आहेत. तर अभियांत्रिकीसाठी कॅरिआॅन देण्याच्या मागणीसाठी एनएसयूआयतर्फे आंदोलन करण्यात आले.