गणरायाला भक्तांची सुरक्षा

By Admin | Updated: September 6, 2014 00:29 IST2014-09-06T00:00:54+5:302014-09-06T00:29:05+5:30

अभिमन्यू कांबळे/ प्रसाद आर्वीकर, परभणी श्री गणरायाच्या मूर्तीची आणि मंडळाची सुरक्षा गणेश भक्तांच्याच भरवशावर असल्याचे ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.

Protection of devotees of Ganapurna | गणरायाला भक्तांची सुरक्षा

गणरायाला भक्तांची सुरक्षा

अभिमन्यू कांबळे/ प्रसाद आर्वीकर,  परभणी
गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या श्री गणरायाच्या मूर्तीची आणि मंडळाची सुरक्षा गणेश भक्तांच्याच भरवशावर असल्याचे ‘लोकमत’च्या चमूने गुरुवारी मध्यरात्री केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. पोलिस यंत्रणेने उत्सवासाठी तगडा बंदोबस्त लावल्याचे सांगण्यात आले होते; परंतु, प्रत्यक्षात केलेल्या पाहणीत शहरातील बहुतांश भागामध्ये पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करताना दिसून आले नाहीत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर येते. प्रशासनातर्फे या उत्सवासाठी मोठा बंदोबस्तही लावला जातो. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये , म्हणून पोलिस यंत्रणा दक्ष असते. परभणी जिल्हा पोलिस दलाने यावर्षी तगडा बंदोबस्त लावल्याचे सांगण्यात आले. त्या अनुषंगाने शहरातील गणेशोत्सवामधील गणेशमूर्ती किती सुरक्षीत आहे, याविषयी ‘लोकमत’च्या चमूने मध्यरात्री स्टिंग आॅपरेशन केले असता गणेश मूर्तीची सुरक्षा भक्तांच्याच भरवशावर असल्याचे समोर आले.
गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर शहरातील विविध गणेश मंडळांना ‘लोकमत’च्या चमूने भेट दिली असता एकाही ठिकाणी पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर असल्याचे पहावयास मिळाले नाही. गणेश मंडळांचे पदाधिकारी मात्र गणेश मंडळाच्या ठिकाणी जागरण करीत असल्याचे दिसून आले.
रात्री एक वाजण्याच्या सुमारास गणेश मंडळांच्या पाहणीला सुरुवात करण्यात आली. स्टेशनरोडवरील विसावा कॉर्नरवरील सरस्वती गणेश मंडळाजवळ मंडळाचा एक कार्यकर्ता झोपलेल्या अवस्थेत आढळला. अष्टभुजा देवी मंदिराजवळील बापूजी गणेश मंडळ शहरातील सर्वात जुने आणि मोठे गणेश मंडळ आहे. या मंडळासही रात्रीच्या वेळी पोलिस संरक्षण नव्हते. सुवर्णकार गणेश मंडळात अशोक लांडगे हे सुरक्षेच्या कारणास्तव रात्रभर थांबतात.
या ठिकाणी देखील होमगार्ड किंवा पोलिस संरक्षण दिसून आले नाही. शिवाजी चौकामध्ये जयहिंद मित्र मंडळाने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे पोलिस चौकीच्याच बाजूलाच हे गणेश मंडळ आहे. असे असतानाही देवेंद्र देशमुख, महेश शहाणे, किरण कुलथे ही मंडळी रात्रभर श्रींच्या सेवेत जागत असल्याचे दिसून आले. जवाहर मित्र मंडळाचे पदाधिकारी मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाचे उपाध्यक्ष कुणाल पाचपोर, पप्पू शिंदे, राहुल शहाणे, सचिन पावडे आदी कार्यकर्ते रात्रभर जागरण करुन श्रींच्या सुरक्षेसाठी तैनात होते. आम्ही रात्रभर या ठिकाणी थांबतो, असे त्यांनी सांगितले. मंडळासाठी पूर्णवेळ पोलिस कर्मचारी दिलेला नाही. पोलिसांचा राऊंडही नियमित न होता अधूनमधून होतो, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील रंगनाथनगर भागातही महाराजा मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीच्या सुरक्षतेतेसाठी मधुकर पैठणे हे एकमेव होमगार्ड तैनात असल्याचे रात्री २ वाजता केलेल्या पाहणीत दिसून आले. यावेळी पैठणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आताच पोलिसांच्या गस्तीची एक जीप येऊन गेली असल्याचे सांगितले. त्यांच्या जवळील डायरीवर एपीआय शेजूळ यांची स्वाक्षरी असल्याची नोंद पहावयास मिळाली. याचवेळी तेथून ही जीप नांदखेडा रोडहून शहरात जाताना दिसून आली. रात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरातील नाथनगर भागातील गणेश मंडळात तेथील पदाधिकारी गप्पा मारत बसल्याचे पहावयास मिळाले. रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास जिंतूर रोडवरील अष्टविनायक गणपती मंदिरास भेट दिली असता तेथे कोणीही दिसून आले नाही. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावले असल्याचे पहावयास मिळाले.
पोलिस व्हॅनचा राऊंड
मंडळांच्या सुरक्षेची पाहणी करीत असताना शिवाजी चौकातून पोलिस व्हॅनचा राऊंड होत असल्याचे निदर्शनास आले. दीड वाजेच्या सुमारास पोलिसांची गाडी मंडळांच्या रस्त्याने जात होती. परंतु, जेवढ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या त्यापैकी एकाही गणेश मंडळस्थळी पूर्णवेळ पोलिसाची नियुक्ती आढळली नाही. केवळ राऊंडच्या माध्यमातूनच सुरक्षेची चाचपणी केली जात असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे मुख्य आणि चांगली स्थिती असलेल्या रस्त्यावरुनच पोलिस व्हॅन फिरत असल्याचे दिसून आले. शहरात १० मोटारसायकलवर गस्त घालण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र एकही मोटारसायकल या स्टिंग आॅपरेशनदरम्यान दिसून आली नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
परभणी शहरातील शिवाजी चौकात स्थापन केलेल्या जयहिंद मित्र मंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर अद्यावत उपाययोजना केली आहे. या ठिकाणी चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अनुचित प्रकारांवर नजर ठेवली जात आहे. मंडळाने स्वत:हून ही यंत्रणा कार्यान्वित केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा भाग संवेदनशील असल्याने येथे पोलिस चौकीच उभारण्यात आली आहे. या चौकीमध्ये पोलिस कर्मचारी बसून होते. चौकीतील वायरलेसवरुन सातत्याने अनेक ठिकाणाहून संदेश येत होते.
बापूजी गणेश मंडळाच्या सुरक्षेसाठी मुस्लिम तरुण सरसावले
स्टींग आॅपरेशन दरम्यान शहरातील अष्टभुजादेवी मंदिर परिसरात बापूजी गणेश मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्तीची रात्री सव्वाच्या सुमारास पाहणी केली असता येथे मजहर शेख व शेख आवेस हे दोन तरुण सुरक्षेसाठी जागता पाहरा देत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधता असता त्यांनी मंडळाचे काही पदाधिकारी आताच बाहेर गेले आहेत. त्यामुळे आम्ही सुरक्षेसाठी बसलो असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांचे गस्तीचे वाहन येथे आले नसल्याचे या तरुणांनी सांगितले.

Web Title: Protection of devotees of Ganapurna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.