जिल्ह्यातील शेकडो अट्टल गुन्हेगारांचे प्रस्तावच तडीपार

By Admin | Updated: July 5, 2014 00:43 IST2014-07-04T23:45:52+5:302014-07-05T00:43:14+5:30

शिवराज बिचेवार, नांदेड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याचे गेल्या सहा वर्षांत तब्बल १२२१ प्रस्ताव तयार करण्यात आले होते़ त्यापैकी फक्त ४५ प्रकरणांत आरोपींना तडीपार करण्यात आले आहे़

Proposal of hundreds of innocent criminals in the district | जिल्ह्यातील शेकडो अट्टल गुन्हेगारांचे प्रस्तावच तडीपार

जिल्ह्यातील शेकडो अट्टल गुन्हेगारांचे प्रस्तावच तडीपार

शिवराज बिचेवार, नांदेड
जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याचे गेल्या सहा वर्षांत तब्बल १२२१ प्रस्ताव तयार करण्यात आले होते़ त्यापैकी फक्त ४५ प्रकरणांत आरोपींना तडीपार करण्यात आले आहे़ तर ५४६ प्रकरणे किरकोळ त्रुटींवरुन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यात विशेष म्हणजे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या ही ६२८ एवढी मोठी आहे़
नांदेड जिल्ह्यात सर्व प्रकारचे गुन्हे घडतात़ येथील गुन्ह्याचा आलेखही नेहमी चढताच राहिला आहे़ बाल -गुन्हेगारांपासून ते रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार जिल्ह्यात खुलेआमपणे चोरी, घरफोडी, दरोडा, खून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे इथे पहावयास मिळते़ त्यामुळे अशा गुन्हेगारांवर वचक रहावा म्हणून तडीपार हे अस्त्र पोलिस दलाच्या भात्यात देण्यात आले आहे़ परंतु या अस्त्राचा प्रत्येकवेळी योग्य वापर होईल, याचीही शाश्वती नाही़ त्यात पोलिसांकडून या अस्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न होत असताना महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मात्र त्याची धार बोथट करण्यात येते़ त्यामुळे गुन्हेगारांचेच फावते़ गेल्या सहा वर्षांतील तडीपारीची आकडेवारी पाहता तोच प्रत्यय येतो़ त्यात नांदेड उपविभागात ३०५, देगलूर-११२, किनवट-२४, भोकर-५६, कंधार-२३, बिलोली-२३, हदगाव-८ व धर्माबादमध्ये ८ तडीपारीचे प्रस्ताव विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत़ त्यातही एस़डी़एमक़डे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची संख्या लक्षणीय आहे़ तर बंद करण्यात आलेल्या प्रकरणांची कारणेही किरकोळ स्वरुपाचीच असल्याची पहावयास मिळाली़
काही प्रकरणांमध्ये पोलिसांनीही हातचलाखी करुन प्रस्तावात त्रुटी ठेवल्याचीही शक्यता आहे़ त्यामुळे अट्टल गुन्हेगारांऐवजी त्यांचे प्रस्तावच तडीपार करण्याचा सपाटा गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सुरु आहे़ त्याचा परिणाम गुन्ह्याचा आलेख वाढण्यात होत असल्याचे पहावयास मिळत आहे़
दोन वर्षांत चक्क हजार प्रस्ताव
पोलिस अधीक्षकपदी विठ्ठल जाधव असताना सर्वात जास्त तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले़ २०१२ मध्ये ७८८ तर २०१३ मध्ये २५५ असे एकूण १०४३ प्रस्ताव या दोन वर्षांत दाखल करण्याचा विक्रम नांदेड पोलिस दलाने नोंदविला़, परंतु हे प्रस्ताव तयार करताना त्यामध्ये असणाऱ्या त्रुटींवर मात्र कुणीही लक्ष दिले नाही़
या गुन्हेगारांना केले जाते तडीपार
समाजकंटक, जातीय गुंड किंवा ज्या व्यक्तीमुळे सामाजिक स्वास्थ बिघडेल, समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करतो असा, क्रियाशील गुन्हेगार, गुन्हेगारांची टोळी, ३ किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या आरोपींना तडीपार केले जाते़ तडीपारीचा प्रस्ताव तयार करताना या सर्व बाबींचा विचार केला जातो़ त्यासाठी न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणासंबंधांची माहितीही नमूद करण्यात येते़
किनवटच्या विठ्ठलनगरमध्ये धाडसी चोरी
नांदेड - किनवट शहरातील विठ्ठलनगरमध्ये प्रशांत सुभाषराव वट्टमवार यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीवरुन अज्ञात चोरट्याने २९ जून रोजी प्रवेश केला़ यावेळी ७ तोळे वजनाचे सोन्याचे गंठन, नगदी १२ हजार रुपये असा एकूण २ लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला़ याप्रकरणी वट्टमवार यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
दोन वर्षांची केली जाते मागणी
गुन्हेगाराला एक किंवा चार जिल्ह्यांतून तडीपार करण्याची मागणी पोलिसांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली जाते़ तसेच जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत तडीपार करता येऊ शकते़
तडीपारीचा भंग केल्यास गुन्हा
एखादा गुन्हेगार तडीपार असेल आणि त्याने तडीपारीचा भंग केल्यास त्याच्याविरोधात मुंबई पोलिस कायदा १४२ नुसार विनापरवानगी हद्दीत आल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येतो़ त्यात २ वर्ष ३ महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे़
प्रस्तावात पोलिसांकडूनही राहतात त्रुटी
गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करताना पोलिस दलाकडून विशेष काळजी घेतली जात नाही़ समजा एखाद्या गुन्हेगारावर तीन गुन्हे दाखल आहेत अन् त्याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार केला असेल तर, इतर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याबाबत काय निर्णय दिला याची साधी माहितीही प्रस्तावात नमूद नसते़ हाच धागा पकडून मग प्रशासनाकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात येतो़ तर दुसरीकडे न्यायालयात त्या आरोपीच्या संबंधाने झालेल्या निर्णयाचीही अनेक महिने पोलिसांना माहितीच नसल्याचे उघडकीस आले आहे़

Web Title: Proposal of hundreds of innocent criminals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.