औरंगाबाद : निर्यातयोग्य केशर आंबा उत्पादनासाठी वापरण्याचे तंत्र, मोहोर संरक्षणासाठी ठिबकमधून द्यावयाचे खताचे वेळापत्रक, संजीवकांचा वापर, सिंचन विरळणी त्यातूनच सुमारे ७० ते ७५ टक्के आंबा निर्यात योग्य होईल, असा विश्वास व्यक्त करीत निर्यातीमध्ये केशर हापूसच्या बरोबरीत चाललाय याकडे महाकेशर आंबा बागातदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवान कापसे यांनी लक्ष वेधले.
मराठवाड्यातील केशर आंब्याच्या ब्रॅण्डिंगसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत महाकेशर आंबा बागातदार संघ स्थापन केला. या संघातर्फे ‘केशर आंब्यासाठी योग्य तंत्रज्ञान’ या विषयावर नुकतेच वेबिनार घेण्यात आले. त्यावेळी डॉ. कापसे बोलत होते. ते म्हणाले, केशर आंबा अमेरिका आणि जपानमध्ये किमतीच्या बाबतीत हापूसची बरोबरी गाठत आहे. संघाच्या सदस्यांनी यावर्षी कल्टारचा वापर आणि इतर सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यामुळे आंबा बागा सर्वत्र तीन आठवडे म्हणजे, नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोहरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिलच्या मध्यावर केशर आंबा काढणे शक्य होईल. त्यामुळे बाजारात चांगला दर मिळेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
संघाचे अध्यक्ष सुशील बलदेव यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिघन लागवड झालेली आहे. याच लागवडीच्या पद्धतीतून येत्या तीन ते चार वर्षांत महाकेशर आंबा बागायतदार संघाचे आठ हजार सदस्यांच्या माध्यमातून १५ हजार हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे नमूद केले. तर महाकेशर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यासंबंधीची माहिती त्यांनी दिली. पंडित लोणारे, शिवाजी उगले, बापूसाहेब शिंदे, रसूल शेख, नंदलाल काळे, जयश्री मदने, विलास कापसे यांच्यासह संघाचे अडीचशेहून अधिक सदस्य शेतकरी वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.